लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर - महिला होमगार्डला पीएसआय बनविण्याचे स्वप्न दाखवून तिच्याशी लज्जास्पद वर्तन करणारा यशोधरानगरचा निलंबित ठाणेदार अशोक मेश्राम गुन्हा दाखल झाल्यापासून भूमिगत झाला. दरम्यान, या घटनेमुळे पोलिसांच्या प्रतिमेवर चिखल उडाला असून समाजाच्या विविध स्तरातून या वृत्तीचा निषेध केला जात आहे.
गेल्या चार महिन्यात पोलीस निरीक्षक अरविंद भोळेसह चार पोलिसांविरुद्ध बलात्कार, विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला. स्पष्ट भूमिका आणि कर्तव्यकठोर धोरण राबविणारे पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी पोलिसांची प्रतिमा खराब करणारे वर्तन केल्यास कडक कारवाईचे स्थानिक पोलिसांना वारंवार इशारे दिले आहे. त्याकडे दुर्लक्ष करणाऱ्यांवर तडकाफडकी निलंबन, गुन्हा दाखल करण्याची कारवाईदेखिल केली आहे. आपली आणि पोलीस दलाची प्रतिमा उंच करा, गुन्हेगारी नियंत्रित करा, गुन्हेगारांना वठणीवर आणा, असे प्रत्येक परेड आणि क्राईम मिटिंगमध्ये पोलीस आयुक्त धडे देत असतात. मात्र, रक्षकाच्या भूमिकेत असलेले अनेक भक्षक वेळोवेळी आपल्या कुकृत्यामुळे उघड होतात. मेश्रामनेही तसेच केले आहे. त्याने सोबत काम करणाऱ्या महिला होमगार्डचा स्वत:च्या कक्षातच विनयभंग केला. त्यामुळे पोलीस आयुक्तांसह सर्वच वरिष्ठ अधिकाऱ्यांमध्ये तीव्र नाराजीचा सूर आहे. समाजातील विविध स्तरातूनही त्याचा निषेध व्यक्त केला जात आहे. तिकडे गुन्हा दाखल होताच मेश्राम भूमिगत झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
निलंबनाची नोटीस दारावर
पोलिसांनी शुक्रवारी मेश्रामच्या घरी जाऊन त्याच्यावर निलंबनाची कारवाई झाल्याची माहिती देण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो आढळला नाही. त्यामुळे मेश्राम राहत असलेल्या घराच्या दारावर निलंबनाची नोटीस चिपकवली.