पोलीस आयुक्तांच्या बदल्यांचा सस्पेन्स
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2020 11:43 PM2020-08-13T23:43:59+5:302020-08-14T01:47:49+5:30
नागपूरसह राज्यातील तीन ठिकाणच्या पोलीस आयुक्तांच्या बदलीपुढे आगामी पदोन्नतीचा मुद्दा उपस्थित झाल्याने ठिकठिकाणच्या पोलीस आयुक्तांच्या बदलीचे गुऱ्हाळ वाढले आहे. या पार्श्वभूमीवर, पोलीस आयुक्त-अतिरिक्त पोलीस महासंचालकांच्या बदलीचा विषय रेंगाळला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नागपूरसह राज्यातील तीन ठिकाणच्या पोलीस आयुक्तांच्या बदलीपुढे आगामी पदोन्नतीचा मुद्दा उपस्थित झाल्याने ठिकठिकाणच्या पोलीस आयुक्तांच्या बदलीचे गुऱ्हाळ वाढले आहे. या पार्श्वभूमीवर, पोलीस आयुक्त-अतिरिक्त पोलीस महासंचालकांच्या बदलीचा विषय रेंगाळला आहे.
१ ऑगस्टपासून राज्यातील आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा विषय रोज वेगवेगळ्या वळणावर येऊन थांबत आहे. तीन दिवसापूर्वी या बदलीच्या अनुषंगाने मुंबईत झालेल्या बैठकीत ठाण्याचे पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांना तेथेच जैसे थे ठेवण्याचा निर्णय झाल्याचे सांगण्यात येते. फणसाळकर यांची चार महिन्यानंतर पदोन्नती होणार असल्याची चर्चा असून त्यामुळेच त्यांना तोपर्यंत ठाण्यातच आयुक्तपदी कायम ठेवण्याचे ठरल्याचे समजते. डिसेंबरमध्ये पोलीस महासंचालक (डीजी) डी. कनकरत्नम निवृत्त होणार, त्यामुळे डीजींची एक जागा रिक्त होईल. त्यासोबतच एडीजी रश्मी शुक्ला, रजनीश सेठ आणि के. व्यंकटेशम हे तीन अधिकारीसुद्धा पदोन्नतीसाठी पात्र ठरतील. हाच मुद्दा आता नागपूर आणि पुणे आयुक्तांसाठीही चर्चेला आला आहे. व्यंकटेशम यांच्यानंतर नागपूरचे पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार यांचीही पदोन्नती होणार आहे. त्यामुळे ठाण्यासोबत पुणे, नागपुरातील पोलीस आयुक्तांच्या बदल्या करायच्या की नाही, यावर एकमत व्हायला तयार नसल्याची खास सूत्रांची माहिती आहे. विशेष म्हणजे, तीन दिवसांपूर्वी या संबंधाने झालेल्या बैठकीत नागपूरच्या पोलीस आयुक्तपदी अतिरिक्त महासंचालक राजेंद्रसिंह यांची नियुक्ती करण्याचे ठरले होते. तत्पूर्वी येथे पोलीस आयुक्त म्हणून प्रभातकुमार आणि सुनील रामानंद यांचीही नावे चर्चेला आली होती. मात्र ही नावे मागे पडली आणि राजेंद्रसिंह यांचे नाव पुढे आले. या पार्श्वभूमीवर, बुधवारी रात्री नागपूर, पुणे, पिंपरी चिंचवड आदी ठिकाणच्या पोलीस आयुक्तांच्या बदल्या झाल्याचा मेसेज सर्वत्र व्हायरल झाला. तेव्हापासून उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे. या संबंधाने संबंधित वरिष्ठ पोलीस अधिकाºयांकडे विचारणा केली असता ते यावर भाष्य करण्याचे टाळत आहेत.
राजेंद्रसिंह म्हणतात...
ज्यांच्या नावाची चर्चा आहे, ते अतिरिक्त पोलीस महासंचालक राजेंद्रसिंह यांना याबाबत विचारणा केली असता आदेश आल्यानंतरच यावर बोलणे योग्य होईल, असे ते म्हणाले.
अजून निश्चित नाही : गृहमंत्री
राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख सध्या मुंबईत आहेत. त्यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी अजून काहीही निश्चित झाले नाही. अशी माहितीवजा प्रतिक्रिया गुरुवारी लोकमतला दिली. गृहमंत्र्यांच्या या प्रतिक्रियेमुळे पोलीस आयुक्तपदाच्या बदलीचा विषय आणखीनच सस्पेन्स वाढवणारा ठरला आहे.