नागपूर : पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या रद्द झाल्यामुळे विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारवर टीका केली आहे. दुसऱ्याच दिवशी बदल्या रद्द झाल्यामुळे कुठे घोटाळा तर झालेला नाही, अशी शंका येत आहे. राज्य शासनाने याचे स्पष्टीकरण दिले पाहिजे, असे ते म्हणाले. नागपुरात गुरुवारी ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
याअगोदरदेखील बदल्यांमध्ये घोटाळा झाला होता. पोलीस उपायुक्तांच्या बदल्यादेखील रद्द झाल्या आहेत. सीबीआय काही बदल्यांची चौकशी करत आहे. त्यामुळे परत घोटाळा झालेला नाही ना, अशी शंका येत आहे, असे ते म्हणाले.
भाजप रोज पोलखोल करत आहे. त्यामुळे सत्तापक्ष अस्वस्थ आहे. त्यामुळे रथावर हल्ला झाला. भाजपच्या पोलखोल रथाच्या यात्रेवर कितीही हल्ले केले तरी पोलखोल थांबणार नाही. पोलिसांनी जर संरक्षण दिले नाही तर त्यांचीदेखील पोलखोल करणार असल्याचा इशारा फडणवीस यांनी दिला. अमरावतीत हिंदूंना निशाणा बनविले जात असून, मंत्र्यांच्या भूमिकेमुळे तणाव वाढत असल्याचा दावा त्यांनी केला. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत राज ठाकरे यांच्यासोबत होते तेव्हा त्यांचे बोल गुलुगुलू वाटत होते. आता राज ठाकरे सत्य बोलायला लागले तर त्यांचे शब्द वर्मी लागत असल्याचेदेखील ते म्हणाले.
राऊतांना सद्बुद्धी मिळेल
शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या नागपुरातील वाढत्या सक्रियतेबाबत विचारणा केली असता, नागपूरच्या वातावरणातच वेगळेपणा आहे. संजय राऊत वारंवार नागपूरला आल्यामुळे त्यांना सुबुद्धी येईल, असा चिमटा त्यांनी काढला.