लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : देशभरातील हजारो गुंतवणूकदारांचे कोट्यवधी रुपये हडपणाऱ्या ठगबाज विजय रामदास गुरुनुले याने त्याच्या अमरावतीतील नातेवाईकाकडे रोकड लपवून ठेवली होती. विशेष म्हणजे, ही रोकड त्याने घरात खड्डा करून त्यात पुरून ठेवली होती. पोलिसांनी अमरावतीत छापा मारून ही ४८.४८ लाखांची रक्कम जप्त केली, अशी माहिती पोलीस उपायुक्त नुरुल हसन यांनी मंगळवारी दुपारी पत्रकारांना दिली.
महाठग विजय गुरनुले आणि त्याच्या टोळीतील साथीदारांचे फसवणुकीचे नवनवे किस्से पुढे येत आहेत. त्यासंबंधीची माहिती उपायुक्त हसन यांनी आज एका पत्रकार परिषदेत दिली. आपल्या विरुद्ध गुन्हा दाखल झाल्याचे कळताच महाठग गुरनुले फरार झाला. त्याने बनवाबनवी करून जमविलेली रोकडही इकडे तिकडे लपवून ठेवण्यासाठी धावपळ केली. मात्र पोलिसांनी त्याच्या मुसक्या बांधल्या. सध्या तो पीसीआर मध्ये आहे. चौकशीत त्याने अमरावतीच्या एका नातेवाईकाकडे रोकड लपवून ठेवली, अशी माहिती दिली. त्यानुसार विशेष तपास पथक सोमवारी गुरनुलेच्या अमरावतीतील नातेवाईकाच्या घरी धडकले. त्यांनी संपूर्ण घरात शोधाशोध केली. मात्र रोकड मिळाली नाही. त्यामुळे पोलिसांनी गुरनुलेला खाक्या दाखविला. त्यानंतर त्याने नातेवाईकाच्या घरात खड्डा खोदून त्यात रक्कम लपवून ठेवल्याचे सांगितले. त्याने ती जागाही दाखवली. त्यानुसार पोलिसांनी खड्ड्यातून ४८. ४८ लाख तसेच मित्राकडून ७ लाख अशी ५५ लाखांची रोकड जप्त केली, असे उपायुक्त हसन यांनी सांगितले.
आतापर्यंत पोलिसांनी आरोपी गुरुनुले त्याची पत्नी आणि साथीदार यांच्याकडून १ कोटी, ३ लाख, ८२, ४३२ रुपयांचा मुद्देमाल जप्त केल्याचीही माहिती दिली.
पोलीस तपासात आरोपी गुरनुले याने जुलै २०२० मध्ये वर्धा जिल्ह्यातील कारंजा घाडगे येथे १० एकर शेती खरेदी केली होती. त्याची किंमत आज ४० लाख रुपये आहे, असेही त्यांनी सांगितले. यावेळी प्रतापनगरचे ठाणेदार भीमराव खंडाळे आणि तपास पथकातील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
---
जप्त आणि फ्रिज केलेली रक्कम
आरोपी गुरुनुले आणि त्याच्या साथीदारांकडून पोलिसांनी जप्त व फ्रीज केलेल्या रकमेचे विवरण खालील प्रमाणे आहे.
अमरावती येथील नातेवाईकाच्या घरी तीन फूट खड्डा खोदून त्यात ४८ लाख, ४७, ८०० रुपये लपवून ठेवले होते. तर नागपुरातील एका मित्राकडे ७ लाख रुपये ठेवले होते.
---
गुरनुलेच्या पत्नीच्या बँक खात्यात ३,२८,१०८ रुपये.
---
कंपनीच्या वेगवेगळ्या ४ खात्यात ५,०६,५२४ रुपये.
---
देवेंद्र गजभियेच्या खात्यात २६ लाख, ४ लाखांची एफडी.
----
इतर आरोपींच्या खात्यात १० लाख.
----