हिंगणा : रायपूर (ता. हिंगणा) प्राथमिक आराेग्य केंद्र व त्याअंतर्गत येणाऱ्या नीलडाेह येथील उपकेंद्रात काेराेना लसीकरण केंद्र सुरू करण्यात आले आहे. लसीकरण सिरिंज खराब निघाल्याने येथील लसीकरण थांबले हाेते. ही गरज ओळखून माजी जिल्हा परिषद सदस्य राजेंद्र हरडे यांनी या उपकेंद्राला एक हजार सिरिंज भेट दिल्या आहेत.
काेराेना प्रतिबंधक लसींच्या वायलसाेबत येणाऱ्या काही सिरिंज खराब निघतात. त्यामुळे लसीकरण प्रक्रियेत अडचणी निर्माण हाेतात. या सिरिंज माेजून दिल्या जात असल्याने जास्तीच्या सिरिंज मागता येत नाही, अशी माहिती आराेग्य विभागातील कर्मचाऱ्यांनी दिली. आता एक हजार अतिरिक्त सिरिंज मिळाल्याने या अडचणी येणार नसल्याचेही कर्मचाऱ्यांनी सांगितले. राजेंद्र हरडे यांनी या एक हजार सिरिंज वैद्यकीय अधिकारी डाॅ. गणवीर यांच्याकडे सुपूर्द केल्या. यावेळी पंचायत समिती सदस्य सुजित भोयर, सरपंच वनिता गडमडे, उपसरपंच मनोज सुभेकर, माजी सरपंच डॉ. रमेश पाटील, सुभाष खडेकर, मंगेश हरणे, आनंद फरकुंडे, मंगेश कुडे यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य व आराेग्य विभागाचे कर्मचारी उपस्थित होते.