तडीपार गुंडावर तलवारीने हल्ला करून केले गंभीर जखमी; रामबागेत मध्यरात्री थरार
By दयानंद पाईकराव | Published: April 13, 2024 06:53 PM2024-04-13T18:53:25+5:302024-04-13T18:53:33+5:30
तिघांना अटक, दोनदा ‘सीपीं’नी भेट देऊनही गुन्हेगारी संपेना
नागपूर : मुलीची प्रकृती बरी नसल्यामुळे तिला पाहण्यासाठी आलेल्या तडीपार गुंडाच्या डोक्यावर तीन आरोपींनी तलवारीने वार करून त्याला गंभीर जखमी केले. ही घटना ईमामवाडा पोलिस ठाण्याच्या हद्दीत शनिवारी १३ एप्रिलला मध्यरात्री १ वाजताच्या सुमारास घडली असून या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. रामबाग परिसरातील गुन्हेगारी आटोक्यात यावी यासाठी पोलिस आयुक्त डॉ. रविंद्रकुमार सिंगल यांनी दोनवेळा या भागाला भेट देऊन नागरिकांचे समुपदेशन केल्यानंतरही या परिसरातील गुन्हेगारी सातत्याने डोकेवर काढत असल्यामुळे आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.
रितेश दीपक तायडे (२७, रा. कामगार भवनजवळ, रामबाग) असे या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या तडीपार गुंडाचे नाव आहे. तो मागील दोन वर्षांपासून तडीपार असून पुसद जि. यवतमाळ येथे राहतो. तर सन्नी सतिश गायकवाड (२४, रा. दहिकर झेंड्याजवळ, ईमामवाडा), साहिल राजेश ऊईके (२०) आणि तुषार नितीन नंदागवळी (२२) दोघे रा. दहिकर झेंड्याजवळ रामबाग अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. रितेश तायडे याच्या मुलीची तब्येत खराब असल्यामुळे त्याच्या पत्नीने फोन करून रितेशला बोलावले. तो रात्री ११ वाजता पुसदवरून नागपुरात आला.
दरम्यान आरोपी साहिल व तुषार हे रितेशच्या घरासमोर मोठ्या आवाजात ओरडत होते. त्यामुळे रितेशने त्यांना घरासमोरून निघून जाण्यास सांगितले. त्यामुळे दोघेही ‘तु रुक तुझे देखते हे’ असे म्हणून तेथून निघून गेले. रात्री १ वाजता आरोपी साहिल व तुषार आरोपी सन्नीला घेऊन आले. सन्नीने रितेशला घराबाहेर काढून ‘तुने मेरे दोस्तो को यहा से क्यो भगाया, आज तुझे जिंदा नही छोडुंगा’ असे म्हणून हाताबुक्क्यांनी मारहाण सुरु केली. तुषार आणि साहिलने रितेशला पकडून ठेवले व सन्नीने तलवारीने रितेशच्या डोक्यावर वार केला. रितेशच्या पत्नीने आरडाओरड केल्यामुळे वस्तीतील नागरिक मदतीसाठी धावले. दरम्यान आरोपी घटनास्थळावरून पळून गेले. जखमी रितेशला उपचारासाठी मेडिकलमध्ये दाखल करण्यात आले. या प्रकरणी इमामवाडाचे सहायक पोलिस निरीक्षक गणेश पवार यांनी आरोपींविरुद्ध कलम ३०७, ३४ नुसार गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली
इमामवाड्यातील गुन्हेगारी संपेना
इमामवाडा पोलिस ठाण्याच्या हद्दीत रामबाग, जाटतरोडीत गुन्हेगारांची संख्या अधिक आहे. या परिसरात नेहमीच चोरी, मारामारीच्या घटना घडतात. येथील गुन्हेगारी आटोक्यात यावी यासाठी पोलिस आयुक्त डॉ. रविंद्रकुमार सिंगल यांनी आतापर्यंत दोन वेळा या वस्त्यांना भेट देऊन तेथील नागरिकांशी संवाद साधला. परंतु त्याचा काहीच परिणाम झालेला दिसत नसून येथील गुन्हेगार अधुन-मधुन डोके वर काढताना दिसत आहेत.
रितेशची १८ एप्रिलला संपणार होती तडीपारी
घटनेतील गंभीर जखमी झालेला रितेश तायडे हा मागील दोन वर्षांपासून तडीपार आहे. तो पुसद जि. यवतमाळ येथे राहत होता. १८ एप्रिल २०२४ रोजी त्याची तडीपारी संपणार होती. परंतु कुठलीही परवानगी न घेता तो शहरात आल्यामुळे ईमामवाडा पोलिसांनी त्याच्या विरुद्धही गुन्हा दाखल केला आहे.