लाखो रुपये डिपॉझिट घेणाऱ्या हॉस्पिटलवर कारवाई करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2021 04:11 AM2021-05-05T04:11:30+5:302021-05-05T04:11:30+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : कोरोनाबाधितांना भरती करण्याअगोदर काही खासगी रुग्णालयांकडून लाखो रुपये डिपॉझिट घेण्यात येत आहे. या रुग्णालयांकडून ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोरोनाबाधितांना भरती करण्याअगोदर काही खासगी रुग्णालयांकडून लाखो रुपये डिपॉझिट घेण्यात येत आहे. या रुग्णालयांकडून राज्य शासनाचे निर्देश पाळल्या जात नसून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी माजी महापौर संदीप जोशी यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांना निवेदनदेखील दिले.
कोरोनाच्या कुठल्याही रुग्णाकडून भरती होण्याच्या वेळी डिपॉझिट घेऊ नये, असे राज्याच्या आरोग्य मंत्र्यांनी निर्देश जारी केले होते. मात्र तरीदेखील अनेक रुग्णालयांकडून या नियमांना हरताळ फासण्यात येत आहे. रुग्णालयांकडून पावतीच्या नावाखाली साध्या कागदावर शिक्का मारून देण्यात येत आहे. अशा प्रकारांमुळे वैद्यकीय क्षेत्राचे नाव खराब होत आहे. हा सर्व प्रकार मनपाद्वारे नियुक्त ऑडिटरशी संगनमत करून होत आहे. त्यामुळे नागरिकांची अशी लुबाडणूक करणाऱ्या हॉस्पिटलवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी संदीप जोशी यांनी केली आहे. रुग्णाला दाखल करताना अर्जावर सही करण्यापूर्वी आपला रुग्ण शासनाच्या ८० टक्के दराने भरती केला आहे की व्यवस्थापनाच्या २० टक्के दराने ते तपासून घ्यावे, असेही आवाहन त्यांनी केले आहे.