लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या हिवाळी परीक्षांच्या पहिल्याच दिवशी परीक्षा रद्द करण्याची वेळ आली. यासंदर्भात विद्यार्थ्यांमध्ये नाराजीचा सूर होताच. भारतीय जनता युवा मोर्चातर्फे याविरोधात विद्यापीठावर हल्लाबोल करण्यात आला. विद्यापीठाने तांत्रिक अडचणी दूर करून सुरळीत परीक्षा घ्यावी, अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा यावेळी देण्यात आला.
तांत्रिक अडचणींमुळे गुरुवारी विद्यार्थी लॉगिनच करू शकले नाही. प्रचंड मनस्ताप सहन करावा लागल्यानंतर परीक्षा रद्द करण्याचा निर्णय त्यांना कळला. या मुद्द्यावरून भाजयुमोच्या शिष्टमंडळाने कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी यांची भेट घेतली. जर शुक्रवारपासून स्थिती सुरळीत झाली नाही, तर विद्यापीठाला आक्रमक आंदोलनाचा सामना करावा लागेल, असे शिष्टमंडळाने सांगितले. यावेळी भाजयुमोचे शहराध्यक्ष पारेंद्र पटले, प्रदेश सचिव कल्याण देशपांडे, राहुल खंगार, सदस्य रीतेश रहाटे यांच्यासह यश सातपुते, सन्नी राऊत, बादल राऊत, शेखर कुर्यवंशी, पिंटू पटेल, संकेत कुकडे, पवन महाकाळकर प्रामुख्याने उपस्थित होते.