परीक्षा घेता, निकाल लावता, मग शिष्यवृत्ती का देत नाही?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2021 08:51 PM2021-06-10T20:51:22+5:302021-06-10T20:54:22+5:30
राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांसाठी एनएमएमएस (नॅशनल मीन्स कम मेरिट स्कॉलरशीप) ही शिष्यवृत्ती परीक्षा केंद्र सरकारच्या मानव संसाधन विभागातर्फे घेतली जाते. पण दुर्दैव तीन तीन वर्ष पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीची प्रतीक्षा करावी लागते.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांसाठी एनएमएमएस (नॅशनल मीन्स कम मेरिट स्कॉलरशीप) ही शिष्यवृत्ती परीक्षा केंद्र सरकारच्या मानव संसाधन विभागातर्फे घेतली जाते. आठव्या वर्गातील विद्यार्थीच ही परीक्षा देऊ शकतात. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेद्वारे परीक्षेचे आयोजन केले जाते. परीक्षेत पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांना दरमहा एक हजार रुपये शिष्यवृत्ती बाराव्या वर्गापर्यंत दिली जाते. ग्रामीण भागातील विद्यार्थी मोठ्या संख्येने ही परीक्षा देतात आणि पात्रही ठरतात. पण दुर्दैव तीन तीन वर्ष पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीची प्रतीक्षा करावी लागते.
विशेष म्हणजे या शिष्यवृत्ती परीक्षेसंदर्भात फारशी जनजागृती नाही. पण राज्यभरातून किमान १ लाखावर विद्यार्थी परीक्षा देतात. दरवर्षी नागपूर जिल्ह्यात शिष्यवृत्तीस पात्र असलेल्या विद्यार्थ्यांची संख्या शंभर ते दीडशेच्या जवळपास असते. जिल्ह्यातील काही शाळा गरीब विद्यार्थ्यांना नियमित या परीक्षेत बसवितात आणि शिष्यवृत्तीच्या माध्यमातून विद्यार्थ्याना आर्थिक साहाय्य मिळविण्यासाठी प्रोत्साहित करतात. जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षण विभागात एका उपशिक्षणाधिकारी दर्जाच्या अधिकाऱ्याकडे या शिष्यवृत्ती जबाबदारी असते. जिल्ह्यातील काही शाळा आणि पात्र ठरलेल्या काही विद्यार्थ्यांकडून गेल्या तीन वर्षापासून शिष्यवृत्तीच मिळाली नसल्याच्या तक्रारी आल्या आहेत. शिष्यवृत्ती का आल्या नाही, याबाबत शाळांकडून शिक्षण विभागात वारंवार विचारणा केली जाते. बरेचदा सांगितले जाते की हे काम आमच्याकडे नाही. कधी सांगितले जाते की पुण्यावरूनच आली नाही. अनेकदा शाळांवरच दोषारोप ठेवला जातो की तुम्ही मुलांचे डिटेल अपडेटच केले नाही. शाळांनी वारंवार शिक्षण विभागाला विद्यार्थ्यांचे अपडेट दिले आहेत. पण शिष्यवृत्ती विद्यार्थ्यांच्या खात्यात जमा झाली नाही.
४ वर्ष झाले शिष्यवृत्ती मिळाली नाही
अश्विनी बडवाईक या विद्यार्थिनीने आठव्या वर्गात एनएमएमएसची परीक्षा दिली. ती शिष्यवृत्तीसाठी पात्रही ठरली. आता ती बाराव्या वर्गात आहेत. पण शिष्यवृत्ती काही जमा झाली नाही. प्रियांशी साखरे ह्या विद्यार्थिनीचीही अशीच तक्रार आहे.
तर परीक्षा कशाला घेतली
प्रतीक्षा हाडेकर या विद्यार्थिनीने २०१९ मध्ये एनएमएमएसची परीक्षा दिली आणि ती पात्रही ठरली. पण अजूनही शिष्यवृत्ती मिळाली नाही. शाळेला विचारणा केली तर, त्यांनी शिक्षण विभागाकडे बोट दाखविले. शिक्षण विभागाने पुण्याकडे बोट दाखवून हात वर केले. शिष्यवृत्ती द्यायचीच नव्हती तर परीक्षा का घेतली, असा सवाल प्रतीक्षाने केला.
- तीन तीन वर्षापासून शिष्यवृत्ती विद्यार्थ्यांना मिळालेली नाही. गुणवंत व हुशार विद्यार्थी दिवस रात्र अभ्यास करून परीक्षेद्वारे पात्र ठरतात. त्यांना शिष्यवृत्तीच्या लाभापासून वंचित ठेवणे म्हणजे त्यांच्या परिश्रमाचे व मेहनतीचा अपमान करणे आहे. या परीक्षेत जिल्ह्यातून फक्त १०० ते १५० विद्यार्थी उत्तीर्ण होतात. तरीही शिक्षण विभाग त्यांच्या हक्काची शिष्यवृत्ती मिळवून देऊ शकत नसेल तर शोकांतिका आहे.
- अनिल शिवणकर, संयोजक, भाजप शिक्षक आघाडी