कोणत्याही रेशन दुकानातून घ्या धान्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 2, 2018 10:54 PM2018-06-02T22:54:31+5:302018-06-02T22:56:56+5:30
रेशन कार्डधारकांना आता धान्यासाठी केवळ आपल्याच रेशन दुकानावर अवलंबून राहण्याची गरज नाही. केवळ शहरातीलच नव्हे तर राज्यातील कोणत्याही जिल्ह्यातील व्यक्ती कुठल्याही जिल्ह्यातील रेशन दुकानातून आपल्या हक्काचे धान्य घेऊ शकतो. नागपूरने राबवलेला हा प्रयोग सध्या संपूर्ण राज्यात राबवला जात आहे, हे विशेष.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : रेशन कार्डधारकांना आता धान्यासाठी केवळ आपल्याच रेशन दुकानावर अवलंबून राहण्याची गरज नाही. केवळ शहरातीलच नव्हे तर राज्यातील कोणत्याही जिल्ह्यातील व्यक्ती कुठल्याही जिल्ह्यातील रेशन दुकानातून आपल्या हक्काचे धान्य घेऊ शकतो. नागपूरने राबवलेला हा प्रयोग सध्या संपूर्ण राज्यात राबवला जात आहे, हे विशेष.
मोबाईल ग्राहकांना ज्याप्रमाणे मोबाईल नंबर न बदलता कंपनी बदलविता येते, त्याच प्रकारची ‘पोर्टेबिलिटी’ची सेवा आता रेशन कार्डधारकांसाठीही उपलब्ध करून देण्यात आली आहे. या सेवेमुळे कार्डधारक कोणत्याही रेशन दुकानातून आपल्या हक्काचे धान्य माफक दरात विकत घेऊ शकतो.
सार्वजनिक वितरण व्यवस्थेत असलेल्या त्रुटी दूर व्हाव्यात, या उद्देशाने राज्य शासनाने राज्यातील सार्वजनिक वितरण व्यवस्थेत सुधारणा करण्याचा निर्णय घेतला. यासाठी एईपीडीएस आणि आधार लिंक करण्यास सुरुवात केली. नागपूर शहरात ९९.९५ टक्के रेशनकार्ड आधारने जोडण्यात आले. नागपूर रेशन विभागाचे एकूण काम पाहता सरकारने नागपूर शहरात पायलट प्रोजेक्ट राबवण्याचा निर्णय घेतला. आधार आधारित सार्वजनिक वितरण व्यवस्था असे याला नाव देण्यात आले. यात नागपूर शहरातील रेशन कार्डचे डिजिटायझेशन करण्यात आले. प्रत्येक रेशन कार्डला आरसीआयडी (रेशन कार्ड आयडेन्टीफिकेशन नंबर) देण्यात आले. यासोबतच शहरातील सर्व ६६५ रेशन दुकानांना पॉस मशीन (पॉर्इंट आॅफ सेल) मशीन उपलब्ध करून देण्यात आल्या. या मशीनद्वारे धान्य विक्रीचे व्यवहार होऊ लागले. एका सॉफ्टवेअरच्या माध्यमातून प्रत्येक व्यवहार अधिकाऱ्यांना कार्यालयात बसून पाहता येत आहे. आधार लिंक व आरसीआयडी नंबरमुळे पोर्टेबिलिटीची सुविधाही उपलब्ध करून देता आली. ही प्रणाली आता संपूर्ण राज्यात अवलंबिली जात आहे.
सार्वजनिक धान्य वितरणात पारदर्शकता
सार्वजनिक अन्न पुरवठा विभागात नवीन आधुनिक प्रणाली विकसित झाल्याने धान्य वितरणात पारदर्शकता आली आहे. आम्ही एका ठिकणी बसून राज्यातील कुठल्याही रेशन दुकनातील व्यवहारांवर लक्ष ठेवू शकतो. तसेच पोर्टेबिलिटीमुळे ग्राहकांनाही आता अधिक सुविधा झाली आहे. त्याचा उपयोही सुरू झाला आहे.
पी.एस. काळे
जिल्हा अन्नधान्य वितरण अधिकारी