ठळक मुद्देसत्यपाल महाराजांचे आवाहनमहापालिकेतर्फे महात्मा फुले, बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी
लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नागपूर महानगरपालिकेच्या वतीने महानगरपालिका कार्यालयाच्या हिरवळीवर महात्मा ज्योतिबा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सत्यपाल महाराजांच्या कीर्तनाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाला महापौर नंदा जिचकार, महापालिका आयुक्त तथा जिल्हाधिकारी अश्विन मुदगल, आमदार डॉ. मिलिंद माने, विरोधी पक्षनेता तानाजी वनवे, उपमहापौर दीपराज पार्डीकर, सहायक आयुक्त महेश धामेचा, स्थायी समिती सभापती विक्की कुकरेजा, बसपा गटनेता मो. जमाल, क्रीडा सांस्कृतिक भवन सभापती नागेश सहारे, मागासवर्गीय दुर्बल घटक सभापती महेंद्र धनविजय, विधी समिती सभापती धर्मपाल मेश्राम, ज्येष्ठ नगरसेवक किशोर जिचकार, बहुजन समाज पक्षाचे जितेंद्र घोडेस्वार, नगरसेविका उज्ज्वला बनकर, माजी नगरसेवक अशोक यावले उपस्थित होते. सत्यपाल महाराज म्हणाले, तुकडोजी महाराज तुरुंगात गेले ते देशासाठी. परंतु राम रहिमसारखे महाराज भलत्याच कारणामुळे तुरुंगात जात आहेत. प्रत्येकाने आपल्या कामाप्रती प्रामाणिक राहिल्यास देशाची प्रगती होईल, असे त्यांनी उपस्थितांना सांगितले. स्वच्छतेच्या बाबतीतही त्यांनी कीर्तनातून प्रकाश टाकला. उघड्यावर शौचाला जाणाऱ्या नागरिकांचा आपल्या भजनातून समाचार घेतला. अंधश्रद्धेवरही त्यांनी टीका करून उपस्थितांना बुवाबाजी, चमत्कारापासून दूर राहण्याचे आवाहन केले. समाजातील उपेक्षितांना मदत करण्याचे आवाहन करीत त्यांनी महागडे फटाके न फोडता गोरगरिबांना मदत करण्यासाठी पुढाकार घेण्यास सांगितले. संचालन जनसंपर्क अधिकारी अशोक कोल्हटकर यांनी केले. कीर्तनाला महानगरपालिकेचे अधिकारी, कर्मचारी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.