तापी-गोदावरी नदी जोडचे काम तीन महिन्यात सुरूहोणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2017 01:01 AM2017-09-24T01:01:03+5:302017-09-24T01:02:39+5:30
नद्यांतून समुद्रात जाणारे पाणी रोखण्यासाठी येत्या काळात काम केले जाणार आहे. दमण गंगा प्रकल्प व तापी- गोदावरी नदी जोड प्रकल्प पूर्ण केले जातील.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नद्यांतून समुद्रात जाणारे पाणी रोखण्यासाठी येत्या काळात काम केले जाणार आहे. दमण गंगा प्रकल्प व तापी- गोदावरी नदी जोड प्रकल्प पूर्ण केले जातील. येत्या तीन महिन्यात तापी- गोदावरी नदी जोड प्रकल्पाचे काम सुरू होईल. यामुळे मराठवाडा व उत्तर महाराष्ट्राचा पाणीप्रश्न मिटेल, असे केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक, जहाज बांधणी व जलसंपदा मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले.
गडकरी म्हणाले, राज्यात सध्या असलेले २२ टक्के सिंचन वाढवून ४० टक्क्यांवर नेण्याची योजना आहे. त्यासाठी समुद्रात वाहून जाणारे पाणी नद्यांमध्ये अडविणे आवश्यक आहे. दमण गंगा प्रकल्प व तापी- गोदावरी नदी जोड प्रकल्प, या दोन्ही प्रकल्पांसाठी ४० हजार कोटी रुपये खर्च होणार आहेत. यापैकी १० टक्के वाटा महाराष्ट्र व १० टक्के वाटा गुजरात सरकार उचलेल. उर्वरित रक्कम केंद्र सरकार देईल. या नदी जोड प्रकल्पामुळे उत्तर महाराष्ट्र व मराठवाड्यातील सर्व धरणे तुडुंब भरतील. यामुळे येथील पाण्याचा प्रश्न सुटेल. गोसेखुर्द प्रकल्पातून पाणी वळविण्याबाबत लवकरच बैठक घेणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
९० टक्के काम झालेले प्रकल्प पूर्ण करणार
विदर्भासह राज्यातील असे काही प्रकल्प आहेत की ज्यांचे काम ९० टक्के पूर्ण झाले आहे. त्यांना थोडा निधी दिला की उर्वरित काम पूर्ण होऊन त्यातून सिंचनासाठी पाणी उपलब्ध होऊ शकते. यासाठी पंतप्रधान सिंचन योजनेंतर्गत निधी दिला जाईल, असेही गडकरी यांनी सांगितले.
विदर्भात बांबू मिशन
येत्या काळात विदर्भात मोठ्या प्रमाणात बांबू लागवडीवर भर दिला जाईल. शेतकºयांच्या धुºयावर बाबूंची लागवड केली जाईल. बांबू लागवडीसाठी नर्सरी सुरू केल्या जातील. वेस्टर्न कोल फिल्ड, मॅगनीज ओअरच्या रिकाम्या जागेवर बांबू लागवड केली जाईल. यामुळे शेतकºयांना आर्थिक उत्पन्न मिळेल व विदर्भाचे चित्र पालटेल, असा विश्वास गडकरी यांनी व्यक्त केला.
गडकरी म्हणाले...
विदर्भातही उसाची लागवड वाढत आहे. त्यामुळे गोसेखुर्दच्या क्षेत्रात वसंतदादा साखर इन्स्टिट्यूटला उसावर संशोधन व मार्गदर्शनासाठी ४५ एकर जागा दिली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
वर्धा जिल्ह्यात गुजरातच्या कंपनीतर्फे ५० हजार एकर जागेवर आॅरगॅनिक कापूस लावण्यात येणार आहे. संबंधित कंपनीने शेतकºयांकडून सव्वापट दराने कापूस खरेदी करावा, असा प्रस्ताव देण्यात आला आहे.
आयटीसी कंपनीतर्फे गडचिरोलीमध्ये बांबूपासून अगरबत्तीच्या काड्या तयार करण्याचा कारखाना उभारला जात आहे.