आॅनलाईन लोकमतनागपूर : राज्यात सत्ताबदल झाल्यापासून उच्च व तंत्रशिक्षणमंत्री विनोद तावडे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या कार्यक्रमांना उपस्थित राहण्याचा मुहूर्त लाभला नव्हता. मात्र हिवाळी अधिवेशनाच्या निमित्ताने शहरातच असणारे तावडे अखेर विद्यापीठाच्या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. विद्यापीठ अनुदान आयोग पुरस्कृत ‘एचआरडी’ केंद्राच्या नवनिर्मित अतिथीगृहाचे उद्घाटन मंगळवार १९ डिसेंबर रोजी त्यांच्या हस्ते होणार आहे. कुलसचिव पूरण मेश्राम यांनी पत्रपरिषदेत रविवारी कार्यक्रमासंबंधी माहिती दिली.शिक्षणमंत्री झाल्यानंतर तावडे यांना विद्यापीठात विविध वेळेला आमंत्रित करण्यात आले. मात्र काही ना काही कारणांमुळे ते उपस्थित राहू शकले नव्हते. नवीन विद्यापीठ कायद्याचा मसुदा अंतिम करण्यासाठी विनोद तावडे यांच्या अध्यक्षतेखाली समिती १ नोव्हेंबर २०१५ रोजी नागपूर विद्यापीठात आली होती. त्यावेळी फक्त दीड तास तावडे दीक्षांत सभागृहात थांबले होते. यावेळी शिक्षणतज्ज्ञांनी तावडे यांच्यावर नाराजीदेखील व्यक्त केली होती. त्यानंतर तावडे विद्यापीठात आलेच नव्हते.विद्यापीठ परिसरातील अंबाझरी वळणमार्गावर विद्यापीठाच्या अतिथीगृहाशेजारीच हा समारंभ सायंकाळी ६ वाजता आयोजित केला आहे. समारंभाच्या अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सिद्धार्थविनायक काणे, प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद येवले राहतील, अशी माहिती कुलसचिव पुरणचंद्र मेश्राम यांनी दिली.विद्यापीठ अनुदान आयोग पुरस्कृत मानव संसाधन विकास केंद्र विद्यापीठात १९८८ पासून कार्यरत आहे. सदर केंद्रात प्रशिक्षण घेण्यासाठी येणाऱ्या नागपूरबाहेरीत शिक्षकांना निवासाच्या व्यवस्थेची सुविधा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने प्रशिक्षणार्थी अतिथीगृहाची उभारणी करण्यात आली.विद्यापीठाच्या निधीतून ३० लाखया निवासी अतिथीगृहासाठी तळमजल्याचे ५१८.६४ चौरस मीटर बांधकाम करण्यात आले असून या बांधकामासाठी एकूण १ कोटी ५ लाख रुपयाचा खर्च करण्यात आला आहे. यापैकी ७५ लक्ष रुपयाचे अनुदान विद्यापीठ अनुदान आयोगाने दिले आहे. उर्वरित ३० लाखांची रक्कम विद्यापीठाच्या निधीतून खर्च झाली असे पूरण मेश्राम यांनी सांगितले.