लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : करदात्यांची सेवा आणि करवसुलीचे कार्य करणाऱ्या आयकर अधिकाऱ्यांनी संतुलन राखणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन नवी दिल्लीचे केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाचे सदस्य पी.सी. मोदी यांनी केले.राष्ट्रीय प्रत्यक्ष कर अकादमी (एनएडीटी) येथे भारतीय महसूल सेवेतील (आयआरएस) अधिकाऱ्यांच्या ७२ व्या बॅचच्या प्रवेश प्रशिक्षणाचे उद्घाटन मोदी यांच्या हस्ते बुधवारी झाले. या प्रसंगी मुख्य अतिथी म्हणून ते बोलत होते. व्यासपीठावर एनएडीटीच्या महासंचालक आशा अग्रवाल उपस्थित होत्या. कोलंबो प्लॅनचा भाग म्हणून बॅचमध्ये भूतानच्या रॉयल सरकारकडून मिळणाºया महसूल सेवेतील दोन अधिकाऱ्यांसह १७३ अधिकाऱ्यांचा समावेश आहे.करदात्यांचा विभागावर विश्वासमोदी म्हणाले, आयकर विभागाने स्वेच्छिक अनुपालन अंतर्गत करदात्यांना स्वत:च्या कर दायित्वाची मोजणी करण्याचे आणि जबाबदारीने करभरणा करण्याची एक यंत्रणा निर्माण केली आहे. पण या यंत्रणेच्या अनुपालनासाठी आयकर अधिकाऱ्यांमार्फत विश्वासपूर्वक पाठपुरावा होणे आवश्यक आहे. आयकर विभागाने ‘कमीतकमी सरकार आणि कमाल प्रशासन’ या सूत्राचा अवलंब केला आहे. तसेच विभागाने सुरू केलेल्या ई-मूल्यांकन, परताव्याची केंद्रीयकृत प्रक्रिया, परताव्याचे संगणकीकरण, ई-फायलिंग, ई-निवारण अशा विविध उपक्रमांद्वारे शासन आणि करदात्यांमधील तफावत कमी झाल्यामुळे करदात्यांचा केंद्रीय प्रशासनावर विश्वास निर्माण झाल्याचे मोदी यांनी स्पष्ट केले. त्यांनी प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्यांना कर्तव्याच्या प्रभावी निर्धारासाठी मूळ क्षमता, समर्पण आणि अखंडता मिळविण्याचा सल्ला आणि करदात्याच्या सेवांवर भर देण्याचा सल्ला दिला.अधिकाऱ्यांमध्ये अनुशासन महत्त्वाचेमोदी म्हणाले, सेवा आणि कर लागू करण्याच्या त्यांच्या दुहेरी जबाबदाऱ्यांमधील संतुलन शोधण्याचा प्रयत्न अधिकाऱ्यांनी केला पाहिजे. अधिकाऱ्यांमध्ये अनुशासन महत्त्वाचे आहे. ७२ व्या बॅचचे प्रशिक्षणार्थी अधिकारी अखंडता, उत्तरदायित्व, परिश्रम, दृढनिश्चय, अनुशासन यासारख्या गुणांच्या मदतीने उच्चतेचे प्रमाण आणि सार्वजनिक सेवा स्थापन करतील, असा विश्वास आहे. कार्यक्रमात एनएडीटी आणि आयकर विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
करवसुलीत अधिकाऱ्यांनी संतुलन राखावे : पी.सी. मोदी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2018 10:46 PM
करदात्यांची सेवा आणि करवसुलीचे कार्य करणाऱ्या आयकर अधिकाऱ्यांनी संतुलन राखणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन नवी दिल्लीचे केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाचे सदस्य पी.सी. मोदी यांनी केले. राष्ट्रीय प्रत्यक्ष कर अकादमी (एनएडीटी) येथे भारतीय महसूल सेवेतील (आयआरएस) अधिकाऱ्यांच्या ७२ व्या बॅचच्या प्रवेश प्रशिक्षणाचे उद्घाटन मोदी यांच्या हस्ते बुधवारी झाले. या प्रसंगी मुख्य अतिथी म्हणून ते बोलत होते.
ठळक मुद्दे ७२ व्या आयआरएस बॅचच्या प्रशिक्षणाचे उद्घाटन