- महाराष्ट्र सांस्कृतिक आघाडी : मुख्यमंत्री, शिक्षण मंत्र्यांना निवेदन
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मराठी मुलखात मराठीची होत असलेली अधोगती बघता आणि मराठी शासनाचेच मराठी विरोधी धोरण बघता, शिक्षणविषयक भाषेमध्ये परिवर्तन करण्याची मागणी महाराष्ट्र सांस्कृतिक आघाडीने केली आहे. त्याअनुषंगाने विज्ञान, अभियांत्रिकीसारखे शिक्षण मराठीतून देण्याची योजना आखण्याचे निवेदन आघाडीने मुख्यमंत्री व शिक्षणमंत्र्यांना दिले आहे.
महाराष्ट्र शासनाने ११वी, १२वी विज्ञान, तंत्रज्ञान संबंधित विषय मराठी माध्यमातून शिकविण्याच्या दृष्टीने तातडीने पावले उचलावी. शाळांना त्या दृष्टीने सक्षम करण्यासाठी योजना आखाव्या व शाळांना त्याअनुषंगाने आवश्यक ते वेतन व वेतनेतर अनुदान देण्याची तयारी दाखवावी, जेणेकरून अभियांत्रिकीसारखे शिक्षण मराठी माध्यमातून शिकविण्याच्या निर्णयाचा लाभ या राज्याला पुढे होऊ शकेल, अशी मागणी आघाडीचे संयोजक डॉ. श्रीपाद जोशी यांनी केली आहे. त्यासाठी लागणारी पाठ्यपुस्तके शासनाने बालभारती व माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळांकडूनच तयार करवून घेऊन प्रकाशित करावी, अशी सूचनाही या निवेदनात देण्यात आली आहे.
---------
ग्रंथनिर्मिती मंडळांचे पुनरुज्जीवन करा
महाविद्यालयीन स्तरावर विज्ञान, अभियांत्रिकी आदी विषयांची पुस्तके सिद्ध करून प्रकाशित करण्यासाठी महाराष्ट्र विद्यापीठ ग्रंथनिर्मिती मंडळांचे पुनरुज्जीवन करावे, असेही या निवेदनात सांगण्यात आले आहे.
---------------
अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेचा निर्णय
अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेने अभियांत्रिकी हा विषय मराठी माध्यमातून शिकवण्याचा निर्णय आधीच जाहीर केला आहे. हिंदी भाषिक राज्यांत विज्ञान, अभियांत्रिकीचे विषय हिंदीतूनच शिकविले जातात. त्यामुळेच, उत्तर प्रदेश, बिहार येथील मुले स्पर्धा परीक्षात आघाडीवर असतात. नवे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण मातृभाषेला महत्त्व देत असल्याने त्या दृष्टीने महाराष्ट्र शासनाने शिक्षणाचे नियोजन करण्याचे आवाहन महाराष्ट्र सांस्कृतिक आघाडीच्या निवेदनात करण्यात आले आहे.
-----------
दोनच दिवसापूर्वी मराठीसाठी आंदोलनाचा इशारा
दोनच दिवसापूर्वी पार पडलेल्या ऑनलाईन चर्चासत्रात मराठी विरोधी धोरणांविरोधात आंदोलन पुकारण्याचा इशारा देण्यात आला होता. यात महाराष्ट्र सांस्कृतिक आघाडीसह मराठी अभ्यास केंद्र, मी मराठी एकीकरण समिती, महाराष्ट्र राज्य ग्रंथालय संघ आदी संघटना सहभागी झाल्या होत्या.
.................