नागपूर : बीएड अनुत्तीर्ण असतानाही उत्तीर्ण असल्याची बोगस गुणपत्रिका सादर करून एका शिक्षकाने नोकरी मिळविली. १९९८ मध्ये त्यांची नियुक्ती झाली, पण गुणपत्रिका बोगस असल्याचे २०२२ मध्ये उघडकीस आले. बोगस गुणपत्रिकेच्या आधारे या शिक्षकाने मुख्याध्यापकाचेही प्रमोशन मिळविले. बोगस गुणपत्रिकेच्या आधारे शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाने केली आहे.
बाळाभाऊ पेठ येथील पंचशील विद्यालयाचे मुख्याध्यापक रंगनाथ पांडुरंग सोनकुसरे यांनी बोगस गुणपत्रिका सादर केल्याने शिक्षणाधिकारी रवींद्र काटोलकर यांनी संबंधित संस्थेच्या अध्यक्ष व सचिवाला या मुख्याध्यापकावर फौजदारी कारवाई करण्याचे पत्र दिले आहे. यासंदर्भात विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे शहराध्यक्ष विठ्ठल जुनघरे व सचिव अविनाश बडे यांनी मुख्याध्यापक रंगनाथ सोनकुसरे यांची तक्रार केली होती. त्यांनी माहितीच्या अधिकारात सोनकुसरे यांची विद्यापीठातून गुणपत्रिका मिळविली. या गुणपत्रिकेत ते अनुत्तीर्ण असल्याचे स्पष्ट आहे. त्यांनी अनुत्तीर्ण गुणपत्रिकेत खाडाखोड करून संस्थेकडे सादर केली. याच कागदपत्राच्या आधारे संस्थेने त्यांचे शिक्षक पदाचे अप्रुव्हल आणले.
शिक्षकांचे वेतन ऑनलाईन करण्यासाठी शालार्थ आयडी काढण्यात आली होती. २०१५ मध्ये सर्व शिक्षकांचे डिग्री प्रमाणपत्र मागविण्यात आले होते. तेव्हाही शिक्षण विभागाला यांची बोगसगिरी लक्षात आली नसल्याचा आरोप अविनाश बडे यांनी केला. बनावट गुणपत्रिका सादर करून सोनकुसरे यांनी शिक्षक पदाची नोकरी मिळविली, शिक्षक पदाच्या वेतनाचा लाभ घेतला. नंतर मुख्याध्यापक पदाच्या वेतनाचा लाभ घेऊन शासनाची मोठ्या प्रमाणात आर्थिक फसवणूक केली आहे. त्यामुळे या शिक्षकांचे वेतन तत्काळ थांबवून, कार्यालयामार्फत सखोल चौकशी करून फौजदारी चौकशी करून सोनकुसरे यांना पदावरून काढून टाकावे, अशी मागणी विठ्ठल जुनघरे व अविनाश बडे यांनी शिक्षणाधिकाऱ्यांना केली आहे.