शिक्षक आमदार किरण सरनाईक यांच्या अर्जावरील निर्णय राखीव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2021 04:08 AM2021-09-25T04:08:32+5:302021-09-25T04:08:32+5:30
नागपूर : शिक्षक आमदार ॲड. किरण सरनाईक यांनी पराभूत उमेदवार शेखर भोयर यांच्या निवडणूक याचिकेविरुद्ध दाखल केलेल्या अर्जावरील निर्णय ...
नागपूर : शिक्षक आमदार ॲड. किरण सरनाईक यांनी पराभूत उमेदवार शेखर भोयर यांच्या निवडणूक याचिकेविरुद्ध दाखल केलेल्या अर्जावरील निर्णय मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने राखून ठेवला आहे. या अर्जावर न्यायमूर्ती रोहित देव यांच्यासमक्ष अंतिम सुनावणी झाली.
भोयर यांनी सरनाईक यांच्याविरुद्ध संबंधित निवडणूक याचिका दाखल केली आहे. त्याद्वारे त्यांनी सरनाईक यांची निवड रद्द करण्याची मागणी केली आहे, तर सरनाईक यांनी या याचिकेविरुद्ध दिवाणी प्रक्रिया संहितेतील सातव्या ऑर्डरमधील नियम ११ अंतर्गत अर्ज दाखल करून ही याचिका प्राथमिक टप्प्यावरच खारीज करण्याची विनंती केली आहे. या अर्जामध्ये याचिकेवर विविध कायदेशीर आक्षेप घेण्यात आले आहेत.
सरनाईक हे विधान परिषदेच्या अमरावती शिक्षक मतदारसंघातून विजयी झाले आहेत. ते व भोयर हे दोघेही अपक्ष उमेदवार होते. सरनाईक यांनी निवडणूक जिंकण्यासाठी मतदारांना साड्या, पैसे व इतर भेटवस्तू वितरित केल्या. त्यामुळे त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला. याशिवाय त्यांनी नामनिर्देशनपत्रासाेबत दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात चुकीची माहिती दिली. लोकप्रतिनिधित्व कायद्यानुसार ही कृती भ्रष्ट व्यवहारामध्ये मोडते असे भोयर यांचे म्हणणे आहे. भोयर यांच्यातर्फे ॲड. श्रद्धानंद भुतडा तर, सरनाईक यांच्यातर्फे ॲड. श्रीरंग भांडारकर व ॲड. प्रवीण देशमुख यांनी कामकाज पाहिले.