लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : देशाच्या भावी पिढीमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्याप्रमाणे ज्ञानी, पराक्रमी, संस्कारी व्यक्तिमत्त्व विकसित होण्याकरिता शिक्षकांनी माता जिजाऊ होऊन विद्यार्थ्यांना घडवावे, असे आवाहन प्रसिद्ध वक्ते डॉ. सुमंत टेकाडे यांनी केले.सोमलवार शिक्षण संस्थेच्या वतीने गुरुवारी संस्थापक गोविंद उपाख्य अण्णासाहेब सोमलवार यांचा ६५ वा स्मृती दिवस कार्यक्रम आयोजित करण्यात आला. त्यावेळी टेकाडे यांचे ‘शिवरायांच्या दृष्टिकोनातून ध्यास उत्कृष्टतेचा’ विषयावर व्याख्यान झाले. हा कार्यक्रम सोमलवार हायस्कूल निकालस येथे पार पडला. शिवाजी महाराज लहानपणी सामान्य मुलांसारखेच होते. असे असतानाही त्यांनी असामान्य पराक्रम गाजवला तो माता जिजाऊ यांच्यामुळे. मराठा साम्राज्याने वैभव गमावले त्या काळात महाराजांचा जन्म झाला होता. परंतु, त्यांनी आपण काय करू शकतो हा विचार मनात आणला नाही. माता जिजाऊ यांनी महाराजांना प्रेरणादायी व पराक्रमाच्या गोष्टी सांगून वाढवले. मराठा साम्राज्य स्थापन करण्यासाठी उभे राहावेच लागेल, हा विचार त्यांच्यामध्ये रुजवला. त्यामुळे शिवाजी महाराज घडू शकले. त्यांनी वयाच्या अवघ्या १५ व्या वर्षी स्वराज्याचे स्वप्न पाहिले होते. त्यासाठी ताकद उभी करताना त्यांनी जातीपातीचा विचार न करता पराक्रमी माणसे जोडली. त्यांनी स्वत:पेक्षा कितीतरी पटीने शक्तिशाली असणाऱ्या शत्रूंना बुद्धी व कौशल्याच्या बळावर धूळ चारली. महाराजांचा गनिमीकावा शत्रूला घाम फोडत होता. बलाढ्य अफझलखानाचा वध महाराजांच्या कूटनीतीची प्रचिती देणारा आहे. शाळांनी विद्यार्थ्यांमध्ये अशाच गुणांची पेरणी केली पाहिजे. विद्यार्थी त्यांच्या समोर येणाºया कोणत्याही संकटांना घाबरायला नकोत. प्रत्येक अडचणीवर ज्ञान, कौशल्य व चातुर्याने मात करणे विद्यार्थ्यांना आले पाहिजे, असे टेकाडे यांनी सांगितले.टेकाडे यांच्या व्याख्यानानंतर अरविंद उपाध्ये (बासरी), राम ढोक (संवादिनी) व वेद ढोक (तबला) यांचा संगीतमय कार्यक्रम झाला. संस्थेचे अध्यक्ष अॅड. मधुकर सोमलवार अध्यक्षस्थानी होते. कार्यक्रमात प्रामुख्याने संस्थेचे उपाध्यक्ष रामदास सोमलवार, सचिव प्रकाश सोमलवार, सहसचिव डी. आर. पांडे, कोषाध्यक्ष रोहित सोमलवार, सदस्या सीमा सोमलवार, सुप्रिया कोलवाडकर, सदस्य महेश सोमलवार, व्यवस्थापन प्रतिनिधी व्यंकटेश सोमलवार उपस्थित होते.स्वातंत्र्यवीर सावरकरांचा सन्मान करास्वातंत्र्यवीर सावरकरांवर केली जात असलेली टीका निरर्थक आहे. ते महान होते. त्यांचा सर्वांनी सन्मान केला पाहिजे, असे मत टेकाडे यांनी व्यक्त केले.
शिक्षकांनी माता जिजाऊ होऊन विद्यार्थ्यांना घडवावे : सुमंत टेकाडे यांचे आवाहन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2019 10:44 PM
देशाच्या भावी पिढीमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्याप्रमाणे ज्ञानी, पराक्रमी, संस्कारी व्यक्तिमत्त्व विकसित होण्याकरिता शिक्षकांनी माता जिजाऊ होऊन विद्यार्थ्यांना घडवावे, असे आवाहन प्रसिद्ध वक्ते डॉ. सुमंत टेकाडे यांनी केले.
ठळक मुद्देसोमलवार शिक्षण संस्थेचा संस्थापक दिवस