नागपूर : भंडाऱ्यात ज्वेलर्सकडून दागिन्यांची बॅग पळविणाऱ्या आंतरराज्यीय टोळीने विदर्भात २० पेक्षा अधिक गुन्हे घडवून रोख तसेच दागिन्यांसह एक कोटीहून अधिक सामानाची चोरी केली आहे. पहिल्यांदाच ही टोळी हाती लागल्यामुळे या टोळीची सत्यस्थिती समोर आली आहे.
भंडारा येथील अवनी ज्वेलर्सचे संचालक विनोद भुजाडे यांच्याकडून दागिन्यांनी भरलेली बॅग चोरट्यांनी पळविली होती. भुजाडे यांनी बॅगमध्ये ७५ लाखाचे दागिने असल्याचे सांगितले होते. त्यानंतर भंडारा पोलिसांसोबत गुन्हे शाखाही तपासाला लागली होती. गुन्हे शाखेने ओम अशोक यादव (२६), रघु कृष्णा यादव (२३), राकेश विजय प्रधान (४०), सरवन सागर यादव (२१) आणि वासुदेव सागर यादव (२१) यांना अटक केली आहे. त्यांच्याकडून दागिन्यांसह १६.७० लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या टोळीचा सूत्रधार ओम यादव आणि रघु यादव आहेत. दोघे आणि त्यांचे तीन साथीदार मूळचे बिहार येथील रहिवासी आहेत. ओम बिहारमध्ये राहतो तर इतर वेगवेगळ्या शहरात काम करतात. आरोपी चार-सहा महिने नागपुरात किरायाच्या घरात राहून गुन्हा करायचे. त्यानंतर ते आपल्या घरी निघून जात होते. ओम आणि त्याचे साथीदार ज्वेलर्स किंवा सराफा व्यापाऱ्यांना आपली शिकार बनवितात. ओम आणि रघु बाईकवर स्वार होऊन व्यापाऱ्यांचा शोध घेतात. चार-पाच दिवस पाठलाग करून त्यांना व्यापाऱ्याच्या दिनचर्येची माहिती होते. रघु बाईक चालवितो तर ओम मागे बसून बॅग पळवितो. राकेश प्रधान ओडिशाच्या कोराईत राहतो. तो चोरी केलेल्या दागिन्यांची विक्री करण्यास मदत करतो. त्यानंतर ओम साथीदारांना त्यांच्या वाट्याची रक्कम देतो. सर्वात जास्त रक्कम तो ठेवतो. त्यानंतर सगळे साथीदार घरी निघून जातात. दोन-तीन महिन्यानंतर ते पुन्हा सक्रिय होतात. त्यांनी जिल्ह्यात शहर आणि ग्रामीण भागासह भंडारा, अमरावती, यवतमाळसह अनेक शहरात २० पेक्षा अधिक गुन्हे घडवून आणले आहेत. यातील सात प्रकरणांचा खुलासा झाला आहे. आतापर्यंत पकडल्या न गेल्यामुळे त्यांची माहिती पुढे आली नव्हती. ही कारवाई पोलीस उपायुक्त गजानन राजमाने यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक मयूर चौरसिया, उपनिरीक्षक झाडोकर, प्रवीण रोडे, रवी अहीर, नरेंद्र ठाकूर, कुणाल मसराम, सागर ठाकरे, सुधीर पवार, आशिष पवार, सुनील ठवकर, चंदू ठाकरे, उत्कर्ष राऊत, सुहास शिंगणे, आशिष पाटील, सूरज भांगडे, प्रीतम येवले यांनी पार पाडली.
.............
इलेक्ट्रॉनिक काट्याचा वापर
सूत्रधार ओम यादव हा चोरी केलेला माल परत देण्यास टाळाटाळ करीत असून, चोरी केलेल्या मालाची रक्कम आपण आयपीएल सट्ट्यात उडविल्याचे सांगत आहे. त्याच्याजवळ दागिन्यांचे वजन करण्यासाठी इलेक्ट्रॉनिक काटा होता. हा काटा मोठ्या टोळीतील सूत्रधार आणि सराफा व्यापारीच ठेवतात. तो अवनी ज्वेलर्समधून ३०० ग्रॅम सोने आणि ८०० ग्रॅम चांदीचे दागिने मिळाल्याचे सांगत आहे.
.........