लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : स्थायी करण्याच्या मागणीसाठी राज्यातील अस्थायी डॉक्टरांनी २ नोव्हेंबरपासून सामूहिक रजा आंदोलन म्हणजे संपाचा इशारा दिला आहे. या संदर्भातील एक पत्र सोमवारी वैद्यकीय शिक्षण विभागाच्या संचालकांना दिले. विशेष म्हणजे, कोरोना महामारीच्या या काळात दोन दिवस काळी रिबीन बांधून डॉक्टरांनी शासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला होता.
राज्यभरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात सुमारे ४५०वर सहायक प्राध्यापक अस्थायी स्वरूपात कार्यरत आहेत. १२० किंवा ३६४ दिवसांची त्यांची नियुक्ती केली जाते. पत्रात नमूद केले आहे की, कोरोनाच्या या महामारीच्या संकटात अस्थायी सहायक प्राध्यापक आपल्या जीवाची पर्वा न करता दिवसरात्र रुग्णसेवा व प्रशासकीय कामकाजाची जबाबदारी पार पाडत आहेत. सेवा नियमित करण्याच्या मागणीसाठी शासनाकडे वारंवार प्रस्ताव पाठविले. परंतु ठोस निर्णय घेण्यात आला नाही. १५ व १६ ऑक्टोबर रोजी काळी रिबीन बांधून रुग्णसेवा दिली. महाविद्यालयाच्या अधिष्ठाता कक्षासमोर निदर्शनेही केली. परंतु या आंदोलनाची शासनस्तरावर दखल घेतली नाही. शासनाच्या या उदासीन धोरणामुळे कोरोनाच्या या काळात नाईलाजाने रजा आंदोलन करावे लागत असल्याचे व या दरम्यान प्रभावित होणाऱ्या रुग्णसेवेला शासन जबाबदार राहील, असेही पत्रात नमूद केले आहे.