नागपूर : सुटी असल्याने पिकनिकला आलेले स्वामीनारायण विद्यालय, वर्धमाननगर, नागपूर येथील कर्मचारी व विद्यार्थी पाेहण्यासाठी वळणा (ता. माैदा) येथील कन्हान नदीच्या पात्रात उतरले. पाेहताना खाेल पाण्यात गेल्याने तिघे बुडाले तर आठ जण बाहेर आले. बुडालेल्यांपैकी एकाचा मृतदेह बाहेर काढण्यात यश आले. ही घटना शनिवारी (दि. २७) सायंकाळी ५.३० वाजताच्या सुमारास घडली.
बुडालेल्यांमध्ये प्रशांत राजाभाई पटेल (२३, रा. तितलागड ओडिशा), अभिषेक जितेंद्रभाई चव्हाण (२१, रा. गौजुल, गुजरात) व हरिकृष्ण वालजीभाई लिंबाचिया (२८, रा. अहमदाबाद, गुजरात) या तिघांचा समावेश असून, यातील प्रशांत पटेल यांचा मृतदेह शाेधण्यात नागरिकांना यश आले. अभिषेक चव्हाण हे संगीत शिक्षक तर प्रशांत पटेल व हरिकृष्ण लिंबाचिया हे शिक्षकेतर कर्मचारी म्हणून स्वामीनारायण मंदिर ट्रस्टच्या वर्धमाननगर, नागपूर येथील स्वामीनारायण विद्यालयात नाेकरी करायचे.
ते ट्रस्टच्या वाठाेडा, नागपूर येथील क्वाॅर्टरमध्ये राहायचे. शनिवारी सुटी असल्याने या तिघांसह एकूण ११ जण वळणा, ता. माैदा येथील स्वामीनारायण गाेरक्षण येथे सायंकाळी ४ वाजताच्या सुमारास पिकनिकसाठी आले हाेते. यात शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांचा समावेश हाेता. या गाेरक्षणलगत कन्हान नदी वाहते. त्यामुळे सर्व जण नदीच्या पात्रात फिरायला गेले हाेते. पाेहताना यातील तिघे नदीत बुडाल्याची माहिती मिळताच उपविभागीय पाेलीस अधिकारी मुख्तार बागवान, ठाणेदार हेमंत खराबे यांच्यासह पाेलिसांनी दाेन बाेटींसह घटनास्थळ गाठले. अंधारामुळे शाेधकार्य थांबविण्यात आले हाेते.
सर्व जण सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास पाेहण्यासाठी पात्रात उतरले. प्रवाह संथ व पाणी उथळ असल्याने सर्व जण आत जायला लागले. यातील कुणालाही पाेहता येत नव्हते. पात्रात समाेर खाेल खड्डा असल्याची जाणीव कुणालाही नव्हता. त्यातच प्रशांत, अभिषेक व हरिकृष्ण त्या खाेल खड्ड्यात शिरले व गटांगळ्या खाऊ लागले. त्यामुळे उर्वरित आठ जण लगेच बाहेर आले व आरडाओरड करू लागले. त्यामुळे परिसरातील नागरिकांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. त्यातच सर्वांनी तिघांना वाचविण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांना यश आले नाही. काही वेळात प्रशांतचा मृतदेह वर आल्याने ताे नागरिकांनी बाहेर काढला.
अंधारामुळे शाेधकार्य थांबविण्यात आले. दाेघांचा शाेध घेण्यासाठी उद्या (रविवार, दि. २८) ‘एनडीआरएफ’च्या जवानांची मदत घेतली जाईल. शाेधकार्याला सकाळपासून सुरुवात केली जाईल.- हेमंत खराबे, ठाणेदार,
पाेलीस ठाणे, माैदा.