अकरावीच्या विद्यार्थ्यांना ‘अॅडमिशन’चे ‘टेन्शन’; मराठा आरक्षणामुळे थांबली प्रक्रिया
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2020 03:26 PM2020-09-16T15:26:00+5:302020-09-16T15:26:22+5:30
सप्टेंबर उजाडला तरी प्रवेशच नाहीत तर शैक्षणिक वर्ष सुरू कधी होणार? अभ्यासक्रम शिकवून पूर्ण कधी होणार आणि पुढील महत्त्वाचे वर्ष असलेल्या बारावीची तयारी कधी करणार? अशा अनेक प्रश्नांसह विद्यार्थी व पालकांना चिंतित केले आहे.
मंगेश व्यवहारे
नागपूर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आधीच उशीरा सुरू झालेली अकरावीची प्रवेश प्रक्रिया आता मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या स्थगितीच्या पार्श्वभूमीवर थांबविण्यात आली आहे. सप्टेंबर उजाडला तरी प्रवेशच नाहीत तर शैक्षणिक वर्ष सुरू कधी होणार? अभ्यासक्रम शिकवून पूर्ण कधी होणार आणि पुढील महत्त्वाचे वर्ष असलेल्या बारावीची तयारी कधी करणार? अशा अनेक प्रश्नांसह विद्यार्थी व पालकांना चिंतित केले आहे.
मराठा आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिल्यामुळे शिक्षण संचालनालयाने अकरावीची प्रवेश प्रक्रिया थांबविली आहे. त्यापूर्वी अकरावीची पहिली फेरी आटोपली होती. त्यात शहरात १३,४५४ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला होता. केंद्रीय प्रवेश समितीच्या अध्यक्षांनी कळविले होते की शासन स्तरावरून आरक्षणासंदर्भात निर्णय झाल्यानंतरच आॅनलाईन प्रवेशाची पुढील कार्यवाही जाहीर करण्यात येईल. त्यामुळे अकरावीचे विद्यार्थी व त्यांचे पालक निर्णयाच्या प्रतीक्षेत आहे.
अजूनही ४५,७१६ जागा रिक्त
शहरात अकरावीच्या ५९,१७० जागा आहेत. ४०,९९० विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. ३४,८७८ विद्यार्थ्यांनी भाग-१ भरला होता. २९,१५९ विद्यार्थ्यांनी आॅप्शन फॉर्म भरला होता. प्रवेशाची पहिली फेरी पूर्ण झाल्यानंतर १३,४५४ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला. त्यानुसार अजूनही ४५,७१६ जागा रिक्त आहेत.
- ग्रामीणमध्ये शिक्षण सुरू, शहरात शिक्षण थांबले
शहरात अकरावीची प्रवेश प्रक्रिया ही केंद्रीय प्रवेश समितीमार्फत राबविण्यात येत आहे. तर ग्रामीण भागात मुख्याध्यापक स्तरावर प्रक्रिया असल्याने प्रवेश प्रक्रिया पूर्णत्वास येत आहे. ग्रामीण भागातील काही महाविद्यालयांमध्ये अकरावीचे आॅनलाईन शिक्षणही सुरू झाले आहे. पण शहरात प्रवेशच निश्चित झाले नसल्याने आॅनलाईन शिक्षणाला संधीच नाही. त्यामुळे अकरावीच्या शहरातील विद्यार्थ्यांचे नुकसान होणार आहे. त्यात विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांचे जास्त नुकसान आहे. कारण जेईई आणि नीटच्या परीक्षेमध्ये अकरावीच्या अभ्यासक्रमाचा समावेश असतो.
वर्ग सुरू व्हायला डिसेंबर उजाडेल
सप्टेंबरचा अर्धा महिना लोटला आहे. आता पहिली फेरी संपली. मराठा आरक्षणामुळे दुसऱ्या फेरीला स्थगिती दिली आहे. निर्णय झाल्यानंतर दुसरी फेरी होणार आहे. त्यानंतरही तिसरी आणि चौथी फेरी शिल्लक आहे. त्यामुळे किमान नोव्हेंबर महिन्यापर्यंत प्रवेशाची प्रक्रिया सुरू राहणार आहे. कॉलेज सुरू व्हायला डिसेंबर उजाडणार आहे. प्रवेश प्रक्रियेत अर्धे सत्र संपणार आहे. पण शिक्षण कसे देण्यात येईल, याबाबत कुठलेही दिशानिर्देश नाहीत.
-डॉ. अशोक गव्हाणकर, महासचिव, विज्युक्टा