दहावीच्या अभ्यासक्रमाला प्रशिक्षणार्थी शिक्षक मिळेनात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 5, 2018 11:27 PM2018-04-05T23:27:47+5:302018-04-05T23:27:56+5:30
दहाव्या वर्गाच्या पुनर्रचित अभ्यासक्रमासाठी राज्यभरात शिक्षकांचे प्रशिक्षण सुरू आहे. परंतु या प्रशिक्षणासाठी लादण्यात आलेल्या अटीमुळे शिक्षकच उपलब्ध होत नसल्याचा आरोप शिक्षक संघटनांनी केला आहे. त्याचबरोबर प्रशिक्षणात काही त्रुटी सुद्धा संघटनांनी काढल्या आहेत. या प्रशिक्षणातून जे तज्ज्ञ प्रशिक्षक होणार आहेत, त्यांना तालुक्यातील शिक्षकांना प्रशिक्षण द्यायचे आहे. परंतु शिक्षकच उपलब्ध होत नसतील, तर विद्यार्थ्यांना कसे शिकविणार, असाही आरोप संघटनांनी केला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : दहाव्या वर्गाच्या पुनर्रचित अभ्यासक्रमासाठी राज्यभरात शिक्षकांचे प्रशिक्षण सुरू आहे. परंतु या प्रशिक्षणासाठी लादण्यात आलेल्या अटीमुळे शिक्षकच उपलब्ध होत नसल्याचा आरोप शिक्षक संघटनांनी केला आहे. त्याचबरोबर प्रशिक्षणात काही त्रुटी सुद्धा संघटनांनी काढल्या आहेत. या प्रशिक्षणातून जे तज्ज्ञ प्रशिक्षक होणार आहेत, त्यांना तालुक्यातील शिक्षकांना प्रशिक्षण द्यायचे आहे. परंतु शिक्षकच उपलब्ध होत नसतील, तर विद्यार्थ्यांना कसे शिकविणार, असाही आरोप संघटनांनी केला आहे.
२०१८-१९ या शैक्षणिक सत्रापासून दहावीचा अभ्यासक्रम बदलत आहे. दहावीच्या पुनर्रचित अभ्यासक्रमाचे शिक्षकांसाठी प्रशिक्षण राज्यभरात सुरू आहे. या प्रशिक्षणातून तालुकास्तरीय तज्ञ प्रशिक्षकाच्या निवडीसाठी २ एप्रिलपर्यंत आॅनलाईन अर्ज मागविण्यात आले होते. त्यात ४५ वर्षाखालील शिक्षक व १० वर्षाचा अध्यापनाचा अनुभव अशा अटी लादल्या होत्या. त्यामुळे आॅनलाईन शिक्षकांचे अर्ज फारच कमी आहे. शिवाय एका विषयाला एकच दिवस प्रशिक्षण देण्यात येणार असल्याने, एका दिवसात नवीन अभ्यासक्रम, पाठ्यपुस्तक ओळख, घटक आशय ओळख, मूल्यमापन योजना आदीबाबत सखोल मार्गदर्शन शक्य नसल्याचे संघटनेचे म्हणणे आहे. नागपूर विभागातील शिक्षकांचे गुरुवार, ५ एप्रिलपासून १७ एप्रिलपर्यंत जिल्हा शैक्षणिक सातत्यपूर्ण व्यावसायिक विकास संस्था येथे प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले आहे. बोर्ड आॅफ स्टडीजचे सदस्य शिक्षकांना हे प्रशिक्षण देत आहे.
ना शिक्षक प्रशिक्षित होईल, ना विद्यार्थी
महाराष्ट्र विद्या प्राधिकरणाने प्रशिक्षकाच्या निवडीसाठी ४५ वर्षाखालील शिक्षकाची अट लादली आहे. त्यामुळे प्रशिक्षणासाठी शिक्षकांकडून प्रतिसाद अत्यल्प आहे. पुस्तकाची निर्मिती करताना वयाची अट नाही, तर तज्ञ प्रशिक्षकाची निवड करताना वयाची अट का?, शिवाय नवीन अभ्यासक्रम एका दिवसाच्या प्रशिक्षणावर शक्य नाही. या अटीमुळे ना शिक्षक प्रशिक्षित होणार आहे, नाही विद्यार्थी.
पुरुषोत्तम पंचभाई, उपाध्यक्ष, महाराष्ट्र राज्य राष्ट्रवादी शिक्षक संघ
- प्रशिक्षण सुरळीत सुरू आहे
विदर्भातील सहा जिल्ह्याचे प्रशिक्षण जिल्हा शैक्षणिक सातत्यपूर्ण व्यावसायिक विकास संस्था येथे सुरू आहे. आॅनलाईन अर्ज मागविण्यात आल्यामुळे शिक्षकांच्या संख्येवर परिणाम होणार होता, त्यामुळे शिक्षकांच्या उपलब्धतेची जबाबदारी तालुकास्तरावर गट शिक्षण अधिकाऱ्याला देण्यात आली होती. आम्हाला विभागातून २१० शिक्षकांची अपेक्षा होती, तरीही १८४ शिक्षक प्रशिक्षणाला आले होते. ४५ वर्षाखालील शिक्षकांची अट असली तरी, आम्ही ४५ वर्षावरील शिक्षकांनाही सामावून घेतले आहे. प्रशिक्षणासाठी बालभारतीकडून पुस्तकेही उपलब्ध करण्यात आली आहे. प्रशिक्षणादरम्यान त्यांना कुठल्याही अडचणी येणार नाही, याची काळजी संस्थेने घेतली असल्याची माहिती समन्वयक विजय चौधरी यांनी दिली.