उपराजधानीतील सुभाषनगरात 'दाऊद', 'याकुब', 'मन्या'ची दहशत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2021 09:12 PM2021-01-19T21:12:42+5:302021-01-19T21:13:37+5:30
Nagpur news उपराजधानीतील गुंडगिरीबद्दल आपण नेहमीच ऐकत असतो. याच उपराजधानीतील सुभाषनगरचे नागरिक दाऊद, याकुब व मन्याच्या दहशतीने चांगलेच हैराण झाले आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : उपराजधानीतील गुंडगिरीबद्दल आपण नेहमीच ऐकत असतो. याच उपराजधानीतील सुभाषनगरचे नागरिक दाऊद, याकुब व मन्याच्या दहशतीने चांगलेच हैराण झाले आहेत. ही तीन नावे कुण्या गुंडांची नसून, परिसरातील वळूंची आहेत. त्यांच्या ‘वळुगिरी’मुळे सुभाषनगर व अवतीभोवतीच्या परिसरात अघोषित संचारबंदी लागली आहे. परिसरातील लहानगे सुटी असूनही घरातच बंद आहेत. मोठ्यांनी सकाळ, संध्याकाळी फिरण्याला व मैदानावरील व्यायामाला तिलांजली दिली आहे. फुटलेल्या मालवाहतूक ऑटोरिक्षा, तुटलेले गेट, पाय तुटलेले तरुण आणि घरांचे गेट बंद करून आत दहशतीत बसलेले नागरिक असे चित्र सध्या सुभाषनगरात बघायला मिळत आहे. मोकाट सुटलेल्या या वळूंच्या गोंधळामुळे स्थानिक नागरिकांनीच त्यांना ही नावे दिली आहेत. सुभाषनगर आणि आजूबाजूच्या परिसरात या तीन वळूंनी गेल्या काही दिवसांपासून अक्षरश: धुडगूस घातला आहे. वळूंच्या लढाईमुळे परिसरात अनेकांचे मोठे नुकसान झाले. त्यांच्या लढाईत काहींच्या दुचाकीचे, तर काहींच्या घराचे नुकसान झाले. लहान मुलांना तर एकटे बाहेर निघण्याची परवानगीच नाही. दोन दिवसांपूर्वी एका भाजी विक्रेत्याचा ठेला या वळूच्या लढाईत अडकला आणि वळूंनी पाच हजारांची भाजी पायाखाली तुडवत मोठे नुकसान केले. सिलिंडरवाल्याची ऑटोरिक्षाच वळूंनी उलटविली. एवढेच नाही तर वळूच्या अफाट ताकतीमुळे मैदानाची संरक्षक भिंतीचा काही भागही कोसळला आहे. परिसरातील मैदानात रोज सकाळी, संध्याकाळी लहान मुले खेळायला यायची. अनेक जण मॉर्निंग, इव्हिनिंग वॉक करायचे. आता मैदानात जायला कोणी धजावत नाही. परिसरातील शंकर पंचेश्वर, छाया चतुरकर, प्रभुनाथ विश्वकर्मा, शीला चव्हाण यांच्या घरचे, कुटुंबाचे नुकसान झाले आहे. महापालिकेने लवकरात लवकर या वळूंचा बंदोबस्त करावा, अशी मागणी येथील नागरिक करीत आहेत.