नागपूर : मुंबईच्या झवेरी बाजारात बॉम्बस्फोट घडवून आणल्याप्रकरणी न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावलेला दहशतवादी मोहम्मद हनिफ अब्दुल रहिम (वय ५६) याचा शनिवारी रात्री येथील मध्यवर्ती कारागृहात मृत्यू झाला. या घडामोडीमुळे कारागृह आणि पोलीस प्रशासनात खळबळ उडाली आहे.
हनीफ हा मुळचा मुळी-७, सलीम चाळ, चिमट पाडा, मरोळ नाका, अंधेरी (ईस्ट) मुंबईचा रहिवासी होता. हनीफ आणि त्याच्या दहशतवादी साथीदारांनी मुंबईच्या झवेरी बाजारात २५ ऑगस्ट २००३ ला बॉम्बस्फोट घडवून आणला होता. या स्फोटात अनेक निरपराधांचा मृत्यू झाला होता. तर, अनेक जण गंभीर जखमी झाले होते. हा बॉम्बस्फोट घडवून आण्यात हनिफ सहभागी असल्याचे स्पष्ट झाल्याने या स्फोटात हनिफ, त्याची पत्नी जायदा सय्यद तसेच अशरफ शफिक या तिघांना मुंबई उच्च न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली होती. तो गेल्या पाच वर्षांपासून येथील मध्यवर्ती कारागृहात बंदीस्त होता.
गेल्या काही दिवसांपासून हनिफची प्रकृती खालावली होती. शनिवारी सायंकाळी त्याची प्रकृती अचानक ढासळली. कारागृहात प्राथमिक उपचार केल्यानंतरही त्याला आराम पडत नसल्याने त्याला मेडिकल ईस्पितळात दाखल करण्यात आले. तेथील डॉक्टरांनी हनिफला मृत घोषित केले. या संबंधाचे वृत्त कारागृहातील वरिष्ठांना रात्रीच कळाले. मात्र, हनिफ बॉम्बस्फोटातील सिद्धदोष कैदी असल्याने रविवारी दुपारपर्यंत याबाबत गोपनीयता बाळगण्यात आली. त्यानंतर रविवारी धंतोली पोलिसांना कळविण्यात आले. पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली. पोलिसांनी या प्रकरणाची माहिती गृहमंत्रालय, मुंबई पोलीस प्रशासन तसेच हनीफच्या नातेवाईकांना कळविली. पुढील तपास सुरू आहे.