राेज ५०० रॅपिड ॲन्टिजेन, आरटीपीसीआर टेस्ट करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2021 04:14 AM2021-05-05T04:14:53+5:302021-05-05T04:14:53+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क माेवाड : शहरासह परिसरातील गावांमधील काेराेना रुग्णांमध्ये वाढ हाेत असून, माेवाड (ता. नरखेड) प्राथमिक आराेग्य केंद्रात ...
लाेकमत न्यूज नेटवर्क
माेवाड : शहरासह परिसरातील गावांमधील काेराेना रुग्णांमध्ये वाढ हाेत असून, माेवाड (ता. नरखेड) प्राथमिक आराेग्य केंद्रात काेराना चाचणीसाठी वापरल्या जाणाऱ्या रॅपिड ॲन्टिजेन व आरटीपीसीआर टेस्टिंग कीटचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे मागील १२ दिवसांपासून येथील रुग्णांसह नागरिकांना चाचणीसाठी भटकंती करावी लागत आहे. या भागातील रुग्णसंख्या लक्षात घेता, या आराेग्य केंद्रात राेज किमान ५०० रॅपिड ॲन्टिजेन व आरटीपीसीआर टेस्ट करण्याची साेय करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
माेवाड शहर व परिसरातील गावांमध्ये काेराेना संक्रमण वेगाने वाढत आहे. त्यामुळे शहरासह ग्रामीण भागातील राेज किमान २५० ते ३०० नागरिक स्थानिक प्राथमिक आराेग्य केंद्रात काेराेना चाचणी करण्यासाठी येतात. आपला नंबर आधी लागावा, म्हणून नागरिक सकाळी ७.३० पासून आराेग्य केंद्राच्या आवारात रांगा लावायला सुरुवात करतात. यातील पहिल्या ५० नागरिकांचीच टेस्ट केली जात असल्यााने उर्वरित नागरिकांना आल्यापावली परत जावे लागते.
टेस्ट करण्यासाठी येणाऱ्यांमध्ये काहीजण काेराेना संक्रमित असतात. त्यांची टेस्ट करण्यात न आल्याने ते माहितीअभावी गृह विलगीकरणात न राहता बाहेर फिरत असतात. या काळात ते कुटुंबीयांसह इतरांच्या संपर्कात येत असल्याने या भागातील संक्रमणाचा वेग अधिक आहे. काहींना काेराेनाची लागण झाल्याची माहिती दुसऱ्या अथवा तिसऱ्या टप्प्यात हाेते. औषधाेपचाराला विलंब हाेत असल्याने यातील काहींना मृत्यूशी झुंज द्यावी लागते. त्यामुळे संभाव्य धाेका टाळण्यासाठी या प्राथमिक आराेग्य केंद्रात टेस्टिंग कीटचा पुरवठा करून ही समस्या साेडविण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
....
औषधाेपचारास दिरंगाई
सध्या माेवाड प्राथमिक आराेग्य केंद्रात रॅपिड ॲन्टिजेन टेस्ट कीट उपलब्ध नसल्याने नागरिकांना आरटीपीसीआर टेस्ट करावी लागत आहे. आरटीपीसीआर टेस्ट कीटचा पुरवठा मर्यादित केला जात असून, या टेस्टचे रिपाेर्ट येण्यास रुग्ण अथवा नागरिकांना चार ते पाच दिवस प्रतीक्षा करावी लागते. या काळात आपण काेराेना पाॅझिटिव्ह आहाेत की निगेटिव्ह, याची नागरिकांना माहिती हाेत नाही. त्यातच पाॅझिटिव्ह असणारे रुग्ण या काळात मनसाेक्तपणे बाहेर फिरत असतात. शिवाय, रिपाेर्ट येण्यास विलंब हाेत असल्याने त्यांच्यावर औषधाेपचारालाही दिरंगाई हाेते.
....
आज (मंगळवार, दि. ४) या प्राथमिक आरोग्य केंद्राला ५० आरटीपीसीआर कीट प्राप्त झाल्या होत्या. त्यामुळे ५० नागरिकांची आरटीपीसीआर टेस्ट करण्यात आली. टेस्टिंग कीट अधिक मिळाल्यास अधिक चाचण्या करणे शक्य हाेईल.
- डाॅ. संजय साेळंके, वैद्यकीय अधिकारी,
प्राथमिक आरोग्य केंद्र, माेवाड.