‘आरडीएसओ’ चमूतर्फे मेट्रो प्रकल्पाचे परीक्षण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2019 10:05 PM2019-02-15T22:05:07+5:302019-02-15T22:06:20+5:30
महामेट्रो नागपूर प्रकल्पाची प्रवासी सेवा लवकरच सुरू होणार असून या अनुषंगाने ‘आरडीएसओ’च्या (संशोधन डिझाईन आणि मानक संघटना) अधिकाऱ्यांचे पथक शुक्रवारी नागपुरात दाखल झाले आणि लगेचच त्यांनी मेट्रो प्रकल्पाचे परीक्षण सुरू केले. आरडीएसओच्या परीक्षणानंतर मेट्रो रेल्वे रुळावर धावणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : महामेट्रोनागपूर प्रकल्पाची प्रवासी सेवा लवकरच सुरू होणार असून या अनुषंगाने ‘आरडीएसओ’च्या (संशोधन डिझाईन आणि मानक संघटना) अधिकाऱ्यांचे पथक शुक्रवारी नागपुरात दाखल झाले आणि लगेचच त्यांनी मेट्रो प्रकल्पाचे परीक्षण सुरू केले. आरडीएसओच्या परीक्षणानंतर मेट्रो रेल्वे रुळावर धावणार आहे.
पथकाने सर्वप्रथम महामेट्रो नागपूरच्या वर्धा मार्गवरील एअरपोर्ट मेट्रो स्टेशन ते काँग्रेसनगर मेट्रो स्टेशनदरम्यान झालेल्या कार्याची ‘आरआरव्ही’च्या (रेल कम रोड व्हेईकल) माध्यमाने पाहणी केली. या अंतर्गत मेट्रो ट्रॅक, ओव्हर हेड ओएचई, मेट्रो स्टेशन्स आणि इतर महत्त्वाच्या घटकांची चाचणी आरडीएसओच्या चमूने केली. चाचणी करीत असताना महामेट्रोच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी नागपूर मेट्रो रेल्वे प्रकल्पाशी संबंधित सर्व माहिती प्रदान केली.
‘आरडीएसओ’ची चाचणी काही दिवस सुरू राहणार असून यात ब्रेक सिस्टीम, निर्वासन प्रणाली आणि इतर सर्व उपकरणांची तपासणी करणार आहेत. तसेच चीन येथून आलेल्या नागपूर मेट्रो कोचेसने प्रवास करून आरडीएसओ पुढील परीक्षण करेल. उल्लेखनीय आहे की, लाँचिंगसाठी महामेट्रोनी आपली तयारी पूर्ण केली आहे, मेट्रो ट्रॅक, ओव्हर हेड ओएचई, सिग्नलिंग व कम्युनिकेशन प्रवासी वाहतूक सुविधा आदी विषयांची तयारी पूर्ण झाली आहे. महामेट्रोतर्फे अनेक महिन्यापासून अविरत कार्य सुरू आहे.