थँक यू गडकरीजी! दोन वर्षीय चिमुकल्याचे वाचवले प्राण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2020 02:47 PM2020-06-05T14:47:39+5:302020-06-05T15:48:48+5:30
अवघ्या दोन वर्षांचा चिमुकला गच्चीवरुन पडल्याने आता काय होणार हीच चिंता लागली होती. डोळ्यासमोर अंधारी आली, काहीच सुचेनासे झाले. परंतु अचानक एक फोन आला. त्यानंतर मुलाच्या उपचारासाठी दिशा सापडत गेली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर: म्हणतात ना की संकट आली की ती एकत्रितपणे येतात अन् अशा स्थितीत माणुसकी जपणे सर्वात महत्त्वाचे ठरते. लॉकडाऊनमुळे कधी नव्हे ते घरच्यांसमवेत वेळ घालवण्याची संधी मिळाली असताना मुलाच्या जीवालाच धोका निर्माण झाला. अवघ्या दोन वर्षांचा चिमुकला गच्चीवरुन पडल्याने आता काय होणार हीच चिंता लागली होती. डोळ्यासमोर अंधारी आली अन् काहीच सुचेनासे झाले. कोरोनाच्या काळात दिल्लीला जायचे कसे याचे उत्तर सापडत नव्हते. परंतु अचानक एक फोन आला अन् त्यानंतर मुलाच्या उपचारासाठी दिशा सापडत गेली. त्या एका फोननंतर मध्यरात्रीनंतर मुलावर वेळेत उपचारही झाले व तो परत बोबडे बोल बोलूदेखील लागला. नकळत वडीलांचे हात जोडल्या गेले अन् तोंडातून शब्द निघाले थॅंक यू गडकरीजी.
उत्तरप्रदेशमधील शामली जिल्ह्यातील उन येथील निवासी नफीस अली हे नागपुरात एका खाजगी कंपनीत काम करतात. सुट्यांमध्ये ते गावाला गेले अन् लॉकडाऊनमुळे तेथेच अडकून पडले. दोन दिवसांअगोदर त्यांचा 1 वर्ष 10 महिन्यांचा मुलगा इस्माईल हा गच्चीवर खेळत असताना तोल जाऊन खाली पडला. 15 फूटांहून अधिक उंचीवरुन पडल्याने तो गंभीर जखमी झाला. त्याला अगोदर स्थानिक दवाखान्यात व त्यानंतर हरयाणातील कर्नाल येथे नेण्यात आले. तेथे त्याच्यावर सिटी स्कॅन केले असता चंदीगड किंवा दिल्ली येथे नेण्याचा सल्ला देण्यात आला. परंतु कोरोनामुळे एम्समध्ये बाहेरील रुग्णांना भरती करणे सहज शक्य होत नसल्याचे चित्र आहे. शिवाय रात्रीची वेळ असल्याने कॅज्युअलिटी बंद राहणार व त्यामुळे उपचार कसे मिळतील हादेखील प्रश्न होता.
नफीस यांच्या कंपनीचे मालक गणेश तिवारी यांना ही घटना कळाली व त्यांनी नागपुरातील सामाजिक कार्यकर्ते गौरांग पांडे यांच्याशी संपर्क साधला. पांडे यांनी नितीन गडकरी यांच्या कार्यालयाशी संपर्क केला. गडकरी यांच्या सूचनेनुसार त्यांच्या कार्यालयातून रात्री सूत्रे हलली व तातडीने दिल्ली येथील एम्सला घेऊन जा असे सांगण्यात आले. तिवारी यांनी तसा निरोप मुलाच्या वडीलांना दिला. रात्री दोनच्या सुमारास लहानग्या इस्माईलला एम्समध्ये दाखल करण्यात आले व तातडीने उपचारांना सुरुवात झाली. आता इस्माईल धोक्याबाहेर असून तो शुद्धीवरदेखील आला आहे.
कुठल्याही प्रकारे थेट संबंध नसताना नितीन गडकरी हे अक्षरशः देवाप्रमाणे माझ्या मुलासाठी धावून आले. त्यांच्या प्रयत्नांतूनच आज माझ्या मुलाचे बोबडे बोल मी परत ऐकू शकलो आहे. माझ्याकडे बोलण्यासाठीदेखील शब्द नाहीत,असे नफीस अली यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.