नागपूर : आकर्षक चेहऱ्यासाठी नाकाचे सौंदर्य खूप महत्त्वाचे असते. त्यामुळेच देशातच नव्हे तर जगभरात नाकाची कॉस्मेटिक सर्जरीचे प्रमाण वाढले आहे. सौंदर्यासोबतच ज्यांना श्वास घेण्यास त्रास होत आहे, ते सुद्धा या सर्जरीसाठी पुढे येत आहे, अशी माहिती रायनोप्लास्टी तज्ज्ञ डॉ. वुल्फगँग गुबिश यांनी आज पत्रपरिषदेत दिली. यावेळी रायनोप्लास्टी तज्ज्ञ डॉ. क्षीतिज पाटील उपस्थित होते.
डॉ. पाटील म्हणाले, देशात नाकाचा शस्त्रक्रियेसाठी अत्याधुनिक सुविधाही उपलब्ध आहेत. विदर्भात दर वर्षी जवळपास एक हजारांवर तरुण-तरुणी नाकाची शस्त्रक्रिया करतात. शस्त्रक्रियेचा आलेख झपाट्याने वाढत आहे. पूर्वी ही सुविधा अमेरिका, युरोप, इंग्लंड सारख्या देशांमध्ये होती, पण आता भारतात सुद्धा उपलब्ध आहे.
-नाकाची शस्त्रक्रिया म्हणजे काय
नाकाची शस्त्रक्रिया किंवा राइनोप्लास्टी म्हणजे, एखाद्या व्यक्तीच्या नाकावर शस्त्रक्रिया करून त्याला नवीन आकार देणे. शस्त्रक्रियेचा मुख्य उद्देश नाकाचा आकार बदलणे किंवा श्वास घेण्याची क्षमता वाढवणे किंवा दोन्ही असू शकतो. नाकाच्या संरचनेचा वरचा भाग हाडांचा असतो. शस्त्रक्रियेत नाकाचे हाड अपुरे असेल तर छातीच्या बरगड्या किंवा कानातील हाड काढून ते लावले जाते.
-२० ते ४० वयोगटातील तरुणांमध्ये क्रेझ
वाकडे नाक, बसकेनाक, जन्मजात विकृतीला घेऊन नाकाच्या शस्त्रक्रियेबद्दल लोकांमध्ये जागरुकता आली आहे. यात २० ते ४० वयोगटातील लोकांची संख्या अधिक आहे. विशेष म्हणजे, यात महिला व पुरुषांचे प्रमाण समान आहे. ‘राइनोप्लास्टी’वर २६ ते २८ ऑगस्ट दरम्यान कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. यात १२ ‘लाइव्ह राइनोप्लास्टी’ शस्त्रक्रिया करून उपस्थित डॉक्टरांना मार्गदर्शन केले जाईल, असेही डॉ. पाटील म्हणाले.