कोमजलेल्या मनावर पडली समुपदेशनाची फुंकर अन् तुटू पाहणारा संसार फुलला

By नरेश डोंगरे | Published: January 1, 2023 10:55 PM2023-01-01T22:55:16+5:302023-01-01T22:55:26+5:30

तिचे गर्भश्रीमंत कुटुंबात लग्न झाले. मात्र, दोन वर्षांतच तिच्या संसाराला दृष्ट लागली. ती माहेरी आली.

The breath of counseling fell on the withered mind and the crumbling world blossomed | कोमजलेल्या मनावर पडली समुपदेशनाची फुंकर अन् तुटू पाहणारा संसार फुलला

कोमजलेल्या मनावर पडली समुपदेशनाची फुंकर अन् तुटू पाहणारा संसार फुलला

googlenewsNext

नागपूर :

तिचे गर्भश्रीमंत कुटुंबात लग्न झाले. मात्र, दोन वर्षांतच तिच्या संसाराला दृष्ट लागली. ती माहेरी आली. वाद एवढे विकोपाला गेले की त्यांच्या या वादामुळे तिच्या सासरच्या मंडळींची सर्वत्र निंदानालस्ती होऊ लागली. ‘अच्छे लोग नही’, असा ठपका बसल्याने तिच्या दिराचे जुळलेले लग्नही तुटले. इकडे तिच्या आई-वडिलांना विविध व्याधींनी घेरले. भावाने आत्महत्या केली. मतभिन्नतेमुळे दोन्ही कुटुंबं टोकाला गेली होती. अशात एका संवेदनशील महिला पोलिस अधिकाऱ्याने या प्रकरणात एन्ट्री केली. दोन्ही कुटुंबांतील सदस्यांच्या भावना समजून घेतल्या. किरकोळ स्वरूपाच्या अटीने हट्टाचे स्वरूप घेतल्याचे लक्षात आले अन् त्या हट्टावर समजूतदारपणाची फुंकर घातली गेली. आपणच आपल्या आप्तांच्या सुखाचे वैरी झाल्याचे दोन्हीकडच्या मंडळींच्या लक्षात आले अन् कोमेजलेली मनं पुन्हा गुलाबासारखी फुलली. विस्कटलेली संसाराची घडी नव्याने व्यवस्थित झाली.

तुटण्याएवढे ताणले गेल्यानंतरही एखाद्या प्रकरणाला भावभावनांची जोड देऊन हाताळले तर पुन्हा कसं आधीसारखचं व्यवस्थित होऊ शकतं, याचा वस्तूपाठ ठरावा, असं हे प्रकरण आहे.

एका सुखवस्तू कुटुंबातील बरखा (२७, नाव काल्पनिक)ला चार वर्षांपूर्वी अकोल्यातील एका गर्भश्रीमंत कुटुंबातील मंडळींनी बघितले. तिचे साैंदर्य अन् वागणे-बोलणे त्यांना एवढे प्रभावित करणारे ठरले की त्यांनी आपल्या मुलासाठी तिला थेट मागणीच घातली. बरखा उच्चशिक्षित, तिची काैटुंबिक पार्श्वभूमीही चांगली. मुलगा समीरही (वय ३०, नाव काल्पनिक) शोभेसाच. बहिणी, भाऊ उच्चशिक्षित. स्थिरस्थावर झालेला मोठा व्यवसाय. नाही म्हणायला संधी नव्हतीच. त्यामुळे दोघांचे लग्न झाले. पहिले वर्ष चांगले गेले अन् नंतर कुरुबुरी वाढल्या. तिला गोंडस मुलगा झाला, मात्र वाद वाढतच गेले. परिणामी ती माहेरी आली. एकमेकांना कमी लेखण्याच्या वादातून नको ते शब्द वापरले गेले. ज्यामुळे मनं जळून-करपून गेली. वर्ष गेले तरी तो तिला न्यायला येत नव्हता अन् ती स्वत:हून परत नांदायला जाण्याचे नाव घेत नव्हती. अशात प्रकरण सप्टेंबर २०२२ मध्ये पोलिस ठाण्यात अन् नंतर भरोसा सेलमध्ये गेले.

दोघांमध्ये समेट व्हावा, यासाठी पोलिसांकडून चार-पाच बैठका घेण्यात आल्या. मात्र, काहीच शक्य होत नव्हते, अशात भरोसा सेलच्या पोलिस निरीक्षक सीमा सुर्वे यांनी हे प्रकरण हाती घेतले. त्यांनी बरखा, समीर अन् दोघांच्याही कुटुंबीयांच्या स्वतंत्र बैठका घेतल्या. त्यांच्या भावना समजून घेतल्या. आपल्या रूममध्ये टीव्ही लावू देत नसल्याने तिने इश्यू केल्याचे आणि ती छोट्या-छोट्या गोष्टीसाठी हट्ट मांडत असल्याने तिच्या सासरच्यांचा इगो हर्ट झाल्याचे लक्षात आल्याने सीमा सुर्वे यांनी दोन्ही कुटुंबातील महिलांचे भावनिकरीत्या कौन्सिलिंग केले. आधीच एवढे नुकसान झाले. काडीमोड झाल्यास दोन्ही कुटुंबांची प्रतिष्ठा धुळीस मिळेल, बरखा-समीरच्या दोन वर्षीय मुलाला त्याची नाहक किंमत चुकवावी लागेल, हे पटवून दिले अन् त्यांच्यासोबतच बरखा-समीरचेही मतपरिवर्तन केले. परिणामी, एकमेकांचे तोंड बघण्याची मानसिकता बाळगणारे एकमेकांच्या गळ्यात पडले. पश्चात्तापाच्या अश्रूंनी सारे गिले-शिकवे धुतले गेले. मावळत्या वर्षाला निरोप देण्याची तयारी सुरू असतानाच त्यांनी पुन्हा सगळ्या जुन्या चुकांना मूठमाती देत नव्याने काैटुंबिक सफर सुरू केली.

अपमानाची आग अन्...
विशेष म्हणजे, समीरकडची फॅमिली चांगली नसल्याची चर्चा या प्रकरणामुळे सुरू झाली होती. बदनामीमुळे समीरच्या भावाचे जुळलेले लग्न तुटले. इकडे बरखाच्या भावानेही वेगळ्या कारणामुळे आत्महत्या केली. दोन्हीकडे असे आघात झाले. तरीसुद्धा बरखा अन् समीरचा हट्ट कसा योग्य आहे, त्याची दुहाई दोघांचेही आई-वडील आपापल्या पाल्यांकडून देत होते. दोन्हीकडच्या मंडळींच्या मनात अपमानाची आग होती. त्यामुळे तुटले तरी चालेल मात्र वाकणार नाही, अशी भूमिका दोन्हींकडून घेतली गेल्याने पोलिसांकडून होणारे समेटाचे प्रयत्न वांझोटे ठरत होते. घटस्फोटच हवा, असा दोन्हीकडचा हट्ट होता. पोलिस का समेटाचे प्रयत्न करतात, असा सवाल करून पोलिसांवरही शंका घेतली जात होती. त्याची पर्वा न करता पोलिस निरीक्षक सुर्वे यांनी हे प्रकरण हाताळले अन् नियत चांगली असेल तर सर्व चांगलेच होते, याचा पुन्हा एकदा प्रत्यय आला.

Web Title: The breath of counseling fell on the withered mind and the crumbling world blossomed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.