लोडशेडींगने त्रस्त ग्राहकांवर आता सिक्युरिटी डिपॉझिटचा भार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2022 11:11 AM2022-04-14T11:11:16+5:302022-04-14T11:12:41+5:30
महावितरणने काही ग्राहकांना सिक्युरिटी डिपॉझिटचे (सुरक्षा ठेव) बिलही पाठवले आहे. त्यामुळे ग्राहकांवर अतिरिक्त भार बसला आहे.
फहीम खान
नागपूर : महावितरणचे वीज ग्राहक सध्या लोडशेडींगमुळे त्रस्त आहेत. अशा परिस्थितीत एप्रिल महिन्यात जे बिल पाठवण्यात आले ते इतर महिन्याच्या तुलनेत अधिक रकमेचे होते. त्यामुळे ग्राहकांची अडचण पुन्हा वाढली आहे. दरम्यान महावितरणने काही ग्राहकांना सिक्युरिटी डिपॉझिटचे (सुरक्षा ठेव) बिलही पाठवले आहे. त्यामुळे ग्राहकांवर अतिरिक्त भार बसला आहे.
महावितरणच्या एका अधिकाऱ्याने लोकमतला सांगितले की, त्यांच्याकडून सर्वच ग्राहकांना सिक्युरिटी डिपॉझिटसाठी मागणी करण्यात आलेली नाही. परंतु बहुतांश ग्राहकांना हे बिल पाठवण्यात आले आहेत. यासाठी अशी तरतूद करण्यात आली आहे की, नियमित सरासरी बिलाच्या हिशेबाने जर कुण्या ग्राहकाचे सिक्युरिटी डिपॉझिट नाही आहे तर त्याच्याकडून अतिरिक्त रकमेची मागणी करण्यात आली आहे. परंतु ज्यांचे सिक्युरिटी डिपॉझिट पुरेसे आहे, त्यांच्याकडून ही मागणी करण्यात आलेली नाही.
- अशी आहे सिक्युरिटी डिपॉझिट (सुरक्षा ठेव)
जर एखाद्या ग्राहकाचे वीजबिल सरासरी १,८०० रुपयाच्या जवळपास येत आहे, तर त्याने यापूर्वी महावितरणकडे १ हजार रुपये सिक्युरिटी डिपॉझिट जमा करून ठेवलेले आहे, तर त्याच्याकडून आता ८०० रुपयाच्या जवळपास सिक्युरिटी डिपॉझिट पुन्हा मागण्यात आले आहे. दुसरीकडे वीज कंपनीतील एका दुसऱ्या अधिकाऱ्याचे म्हणणे आहे की, महावितरण आपल्या ग्राहकांकडून १५०० रुपये सिक्युरिटी डिपॉझिट करून घेत असते. परंतु ज्या ग्राहकांची रक्कम विविध कर कापल्यानंतर कमी होऊन ५०० रुपयापेक्षा कमी झाली आहे त्यांच्याकडून अतिरिक्त रक्कम मागण्यात आली आहे. नाव न छापण्याच्या अटीवर दुसऱ्या एका अधिकाऱ्याने तर असेही सांगितले की, ज्यांच्या खात्यात १०६० रुपयांची रक्कम अगोदरच जमा असेल तर त्यांनी पुन्हा अतिरिक्त रक्कम भरू नये.