कारमध्ये आत्महत्या करणाऱ्या उद्योजकाच्या पत्नीचेही निधन
By ऑनलाइन लोकमत | Published: July 25, 2022 12:13 PM2022-07-25T12:13:43+5:302022-07-25T12:14:12+5:30
रामराज भट यांचे नट-बोल्ट उत्पादनाचे काम होते. कोरोनामुळे त्यांच्या व्यवसायाला प्रचंड नुकसान झाले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : आर्थिक विवंचनेमुळे उद्योजक रामराज भट यांनी कारमध्येच स्वत:ला जाळून घेतल्याच्या घटनेला पाच दिवस झाल्यानंतर त्यांच्या पत्नी संगीता यांचेदेखील निधन झाले. यात जखमी झालेला त्यांचा मुलगा नंदन याची प्रकृती स्थिर आहे. या प्रकरणात बेलतरोडी पोलिसांनी अगोदर अकस्मात मृत्यूचा गुन्हा दाखल केला होता; मात्र संगीता यांच्या निधनानंतर भट यांच्याविरोधात हत्या व हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रामराज भट यांचे नट-बोल्ट उत्पादनाचे काम होते. कोरोनामुळे त्यांच्या व्यवसायाला प्रचंड नुकसान झाले. त्यामुळे भट आर्थिक कोंडीला सामोरे जात होते. आर्थिक विवंचनेतून भट यांनी कुटुंबीयांनाच संपविण्याचा निर्णय घेतला. १९ जुलै रोजी वर्धा मार्गावरील एका पॉश हॉटेलमध्ये जेवणाच्या बहाण्याने ते पत्नी व मुलाला घेऊन कारमधून निघाले. जवळपास एकच्या सुमारास खापरी पुनर्वसन केंद्राजवळ कार थांबवून भट यांनी पत्नी व मुलाला पिण्यासाठी विष दिले. दोघांनाही संशय आल्याने भट यांनी हे ॲसिडिटीचे औषध असल्याचे सांगण्यास सुरुवात केली हाेती.
नंदनचा जबाब, वडिलांनीच आग लावली
भट यांची पत्नी व मुलगा यांच्यावर उपचार सुरू असल्याने त्यांचा जबाब घेणे पोलिसांना शक्य झाले नव्हते. संगीता यांचा मृत्यू झाल्याने नंदनच्या जबाबावरच अनेक गोष्टी अवलंबून होत्या. बेलतरोडी पोलिसांनी अखेर त्याचा जबाब घेतला. वडील असे काही पाऊल उचलतील याची काहीच कल्पना नव्हती, असे त्याने सांगितले. ज्यावेळी ही घटना घडली तेव्हा त्याने व त्याच्या आईने अक्षरश: रस्त्यावर लोळून त्यांना लागलेली आग विझविली होती; परंतु वडिलांचा डोळ्यासमोर मृत्यू झाला.