ज्याच्यावर विश्वास ठेवला तो कार चालकच निघाला चोर
By दयानंद पाईकराव | Published: May 23, 2024 04:46 PM2024-05-23T16:46:52+5:302024-05-23T16:47:20+5:30
३.२१ लाखांच्या दागिन्यांची चोरी : पत्नी रुग्णालयात असताना घरमालकाने दिली होती घराची चावी
नागपूर : घरातील ३ लाख २१ हजारांचे दागीने चोरी करण्यात कार चालकाचा हात असल्याची बाब गुन्हे शाखेच्या युनिट १ ने उघडकीस आणून आरोपी कार चालकाला अटक करून ३ लाख ५४ हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
अंकित दिलीप भोगे (४५, रा. परसोडी, वर्धा रोड, बेलतरोडी) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. फिर्यादी देवेंद्र प्रतापसिंग रॉय (६४, रा. आर. एच. ११, बुंदेल महिंद्रा मिहान खापरी) हे सेवानिवृत्त झाले आहेत. १२ मे रोजी ते बंगळुरला जाण्याची तयारी करीत असताना त्यांना आलमारीत ठेवलेल्या सोन्याच्या बांगड्या, हार, अंगठी असा एकुण ३ लाख २१ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल दिसला नाही.
याबाबत त्यांनी सोनेगाव पोलिसात तक्रार दिली होती. दरम्यान १ मे रोजी सकाळी १० ते ३ मे रोजी रात्री १०.२० दरम्यान रॉय यांची पत्नी स्वामी विवेकानंद हॉस्पिटलमध्ये भरती असल्यामुळे त्यांनी घराची चावी घरकाम करणाऱ्या महिलेला दिली होती. या महिलेसोबत त्यांच्या कारचा चालक आरोपी अंकित हा सुद्धा त्यांच्या घरी आला होता. या गुन्ह्याच्या समांतर तपासात गुन्हे शाखेच्या युनिट १ चे निरीक्षक सुहास चौधरी, सहायक पोलिस निरीक्षक सचिन भोंडे, मनोज टेकाम, सुशांत सोळंके, बबन राऊत, रवि राऊत यांनी कारचालक अंकितला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने चोरीची कबुली केली. आरोपीच्या ताब्यातून ३ लाख ५४ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. आरोपीने इतर दागिन्यांची विक्री केल्याची माहिती पोलिसांना दिली. आरोपीविरुद्ध कलम ३८० नुसार गुन्हा दाखल करून त्यास सोनेगाव पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.