टेकडी उड्डाणपुलाचे अस्तित्व संपले, जमीनदोस्त करायला लागला महिनाभराचा कालावधी
By मंगेश व्यवहारे | Published: August 19, 2023 12:59 PM2023-08-19T12:59:39+5:302023-08-19T12:59:46+5:30
१६.२३ कोटी रुपये खर्चून बनविण्यात आलेल्या टेकडी उड्डाणपुलाला महिन्याभरातच जमीनदोस्त करण्यात आले.
नागपूर : १६.२३ कोटी रुपये खर्चून बनविण्यात आलेल्या टेकडी उड्डाणपुलाला महिन्याभरातच जमीनदोस्त करण्यात आले. १९ जुलै रोजी उड्डाणपुलाला पाडण्याची कवायत सुरू झाली. १५ दिवसांत हे काम होणार होते, पण पाऊस आणि तांत्रिक अडचणीमुळे पूल जमीनदोस्त करायला महिनाभराचा कालावधी लागला. शुक्रवारी जयस्तंभ चौकाच्या भागातील मलब्यातील लोखंडी सळाखी कापण्याचे काम सुरू होते. एक दोन दिवसात येथील मलबाही उचलण्यात येईल. त्याचबरोबर या टेकडी पुलाचे अस्तित्व संपुष्टात येईल.
८१२ मीटर लांब व १०.५ मीटर रुंद उड्डाणपुलाचे बांधकाम २००८ मध्ये झाले होते. १७५ दुकाने बनविण्यात आली होती. पैकी १६० दुकानांचे वितरण झाले होते. ६ पदरी रस्त्यासाठी उड्डाणपूल पाडण्याचा निर्णय २०१८ मध्ये महापालिकेच्या सभागृहात घेण्यात आला. परंतु न्यायालयात व मोबदल्याचा फार्म्युला निश्चित करण्यात २०२३ उजाडले. महामेट्रोकडून मिळालेल्या माहितीनुसार उड्डाणपुलाचे ४७ स्पॅन पूर्णत: पाडण्यात आले आहे. उड्डाणपुलाचा २२ मेट्रिक टन मलबा निघाला आहे. शनिवार, रविवार दरम्यान मलबा पूर्ण उचलण्यात येईल.
केव्हा मिळणार कायमस्वरूपी दुकाने
उड्डाणपुलाखाली असलेल्या दुकानदारांना महामेट्रोकडून मध्य प्रदेश बस स्टॅण्डला लागून असलेल्या भागात १११ दुकाने अस्थायी स्वरूपात बनवून देण्यात आली आहे. या दुकानदारांना स्थायी दुकान देण्याचा निर्णय झाला आहे. ही दुकाने कधी बनणार आणि दुकानदारांना कधी वितरित होणार यासंदर्भात कुणीही चर्चा करीत नाही. रामझुल्याकडून रिझर्व्ह बँक चौक व एलआयसी चौक जाणाऱ्या वाय शेप पुलाचे लोकार्पण एप्रिल महिन्यात झाले. पण ६ पदरी रस्त्याचे काम उड्डाणपूल पाडण्यासाठी थांबले होते. हा रस्ता कधी बनेल यावरही प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.