नागपूर : आठवडाभर ढगाळ वातावरण व अवकाळी पावसाचा हवामान विभागाने वर्तविलेला अंदाज दुसऱ्या दिवशीही चुकला. २४ तासात कमाल तापमान एका अंशाने घटले असले तरी उन्हाची दाहकता अधिक तीव्रपणे जाणवत राहिली. असे असले तरी विदर्भात पुढचे चार दिवस वादळी वारे व विजांच्या कडकडाटासह तुरळक ठिकाणी किरकाेळ पाऊस हाेण्याचा वेधशाळेचा अंदाज कायम आहे.
तीन दिवसांपासून उन्हाची तीव्रता अधिकच वाढली आहे. शनिवारी बहुतेक जिल्ह्यातील कमाल तापमान एक ते दाेन अंशाने घटले, पण बुलढाणा वगळता विदर्भातील सर्व जिल्ह्यात तापमान ४० च्यावर कायम आहे. नागपुरात पारा १.२ अंशाने घटत ४०.२ अंशावर पाेहचला. चंद्रपुरात तापमान २ अंशाने घसरत ४१.८ अंशावर आले. इतर जिल्ह्यात तापमान एक-दीड अंशाने खाली आले. दिवसाचे तापमान घटले पण रात्रीचा पारा वाढला आहे. त्यामुळे रात्रीचा उकाडा वाढला आहे. दिवसा उन्हाच्या तडाख्यामुळे दुपारी रस्त्यावरची वर्दळ कमी झाल्याचे चित्र आहे. उष्णता व घामाच्या धारांनी लाेकांची अस्वस्थता वाढली आहे.
दरम्यान हवामान विभागाच्या अंदाजानुसार पुढच्या २४ एप्रिलपर्यंत विदर्भ, मराठवाड्यात ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे. वादळी वारे व विजांच्या कडकडाटासह अवकाळी पाऊस हाेण्याचीही शक्यता वर्तविली आहे. दाेन दिवस चुकलेला अंदाज पुढे कसा राहिल, याकडे लक्ष लागले आहे.