नागपूर : डायल ११२ वर फोन करत एका महिलेचा खून झाल्याची खोटी माहिती देत पोलीस यंत्रणेला उगाच कामाला लावणे एका व्यक्तीला चांगलेच महागात पडले. पोलिसांनी त्याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. आश्चर्याची बाब म्हणजे त्याने पोलिसांची ‘मजाक’ करण्यासाठी फोन केल्याचा दावा केला आहे. कळमना पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली.
लक्ष्मण मेहतर पवार (४०, धरमनगर) असे आरोपीचे नाव आहे. २० फेब्रुवारी रोजी रात्री पावणे अकरा वाजताच्या सुमारास डायल ११२ वर फोन केला. मी घटनास्थळावर असून एका व्यक्तीने त्याच्या पत्नीचा खून केला आहे. लगेच मदत हवी आहे, असे त्याने म्हटले. शहरात अगोदरच हत्यांचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे डायल ११२ वरून कळमना पोलीस ठाण्यात माहिती वर्ग करण्यात आली. तेथील बिट मार्शल्स अतुल पिट्टलवार व दशरथ कातखडे यांनी पत्ता विचारण्यासाठी संबंधित मोबाईलवर फोन केला असता समोरील व्यक्तीने असे काहीही झाले नाही. मी मजाक करण्यासाठी फोन केला असे त्याने म्हटले. त्यानंतर त्याने फोन स्वीच ऑफ केला. पोलिसांचे पथक संबंधित शिवमंदिराजवळ गेले व त्यांनी लक्ष्मणचा शोध घेतला. त्याला विचारणा केली असता केवळ गंमत म्हणून मी फोन केल्याचे त्याने सांगितले. पोलिसांनी दिशाभूल केल्याचा ठपका ठेवत त्याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.