लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मानकापूर विभागीय क्रीडा संकुलाच्या आसमंतावर रविवारी पहाटे एरोमॉडेलिंगचा थरार अनुभवायला मिळाला. एरोमॉडेलिंगसोबतच हॉर्स रायडिंग व विविध सांस्कृतिक मेजवानीचा हजारो शाळकरी विद्यार्थ्यांनी अनुभव घेतला.
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त क्रीडा विभाग, राष्ट्रीय छात्र सेना व विदर्भ एरोस्पोर्टस् असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने हा ‘एरोमॉडेलिंग शो’ आयोजित करण्यात आला होता. यात एनसीसीच्या कॅडेट्सद्वारे हॉर्स रायडिंगचे अडथळे पूर्ण करणारे चित्तथरारक कर्तब सादर करण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराजांचे भारुड, देशभक्तीपर गीतांच्या तालावर नृत्य या सांस्कृतिक कार्यक्रमांचे सादरीकरण झाले. एनसीसीतर्फे २५ विविध एरोमॉडेल्सचे आकाशात विविधांगी प्रदर्शन करण्यात आले.
यामध्ये चुक ग्लायडर, क्याटापुल्ट ग्लायडर, सीएल एरोबॅक्टिक्स, आरसी ग्लायडर, स्काय सरफर, सुखोई, डेल्टा विंग, फ्लाइंग सॉसर, फ्लाइंग कॅडेट, पॅरामोटर, इलेक्ट्रिक जेट मॉडेल- एफ १८, मायक्रोलाईट, मल्टीकॉप्टर, स्नुपी, काओस, आदी एरोमॉडेल्सचा सहभाग होता. एनसीसीच्या टुसीटर ‘मायक्रोलाईट वायर’ विमानाचे प्रत्यक्षरीत्या मानकापूर स्टेडियमवरून अगदी जवळून करत पथ संचलनाने विद्यार्थ्यांची मने जिंकून घेतली. यावेळी पॅव्हेलियन ॲथलेटिक्स बिल्डिंगचेही लोकार्पण करण्यात आले.
क्रीडा मंत्री सुनील केदार यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष रक्ष्मी बर्बे, आ. विकास ठाकरे, आ. अभिजित वंजारी, माजी मंत्री राजेंद्र मुळक, सतीश चतुर्वेदी, विभागीय आयुक्त प्राजक्ता लवंगारे-वर्मा, जिल्हाधिकारी आर. विमला, मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर, एनसीसीचे मेजर जनरल वाय. पी. खंडोरी, ब्रिगेडिअर एस. लाहेरी, कॅप्टन (नौसेना) सतपाल सिंग, कॅप्टन (एव्हीएशन) प्रवीण शर्मा, क्रीडा व युवक सेवा विभागाचे उपसंचालक शेखर पाटील, जिल्हा क्रीडा अधिकारी अविनाश पुंड उपस्थित होते.
एनसीसी कॅडेट्सचा सन्मान
प्रजासत्ताक दिनी परेडमध्ये नागपुरातील एनसीसीच्या सात कॅडेट्सनी सक्रिय सहभाग नोंदवून प्रथम क्रमांक मिळविला. यावेळी त्यांचा सत्कार करण्यात आला.
यात एसयुओ मनीष वावरे, हर्ष पुरी, मयंक चिचुलकर, ओम झाडे, जेयुओ श्रुती ओझा, एसयुओ प्रिया मिश्रा, एसयुओ तृशाली कुथे यांचा समावेश होता. तसेच नेव्हल युनिटचा जलतरणपटू जयंत दुबळे, रिषिका बोदेले आणि अमोद शाह यांचाही सत्कार करण्यात आला.