नागपूर : ट्राॅलीत ठेवलेल्या टँकमधील पाण्याने जाेरात हेलकावे घेतले आणि त्याच्या जाेरामुळे ट्राॅलीसह त्यातील टँक राेडलगत फेकली गेली. त्यामुळे चालक ट्रॅक्टरखाली दबला गेला. यात गंभीर दुखापत झाल्याने त्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला. ही घटना कन्हान (ता. पारशिवनी) पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील कन्हाननजीकच्या कांद्री येथे शनिवारी (दि. २१) सकाळी ८ वाजताच्या सुमारास घडली.
सचिन साहेबराव शिंदे, रा. संताजीनगर, कन्हान, ता. पारशिवनी असे मृत ट्रॅक्टरचालकाचे नाव आहे. सचिन एमएच-३१/जी-१३६२ क्रमांकाच्या ट्रॅक्टरवर चालक म्हणून काम करायचा. हा ट्रॅक्टर कन्हान येथील सहानी ट्रेडर्सच्या मालकीचा आहे. सचिनने ट्रॅक्टरच्या ट्राॅलीमध्ये ठेवलेल्या टँकमध्ये पाणी भरले आणि कांद्रीहून कन्हान शहराकडे यायला निघाला.
ट्रॅक्टरचा वेग आणि राेडवरील धक्क्यांमुळे टँकमधील पाणी हेलकावे घेत हाेते. मध्येच टँकमधील पाण्याने जाेरात हेलकावे घेतले आणि टँकसह ट्राॅली राेडलगत फेकली गेली. त्यामुळे सचिन ट्रॅक्टरखाली दबला गेला. त्यामुळे त्याला गंभीर दुखापत झाली. अपघात हाेताच नागरिकांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. त्यांना अवजड ट्रॅक्टरखाली दबलेल्या सचिनला वेळीच बाहेर काढणे शक्य झाले नाही. त्यामुळे सचिनचा घटनास्थळीच मृत्यू झाला. पाेलिसांनी घटनास्थळ गाठून सचिनचा मृतदेह बाहेर काढला व उत्तरीय तपासणीसाठी कामठी शहरातील उपजिल्हा रुग्णालयात पाठविला. याप्रकरणी कन्हान पाेलिसांनी भादंवि २७९, ३०४ (अ) अन्वये गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
याेग्य उपाययाेजनांचा अभाव
कन्हान शहरात पाणीटंचाई निर्माण झाल्याने काही नागरिक टँकरद्वारे पाणी बाेलावतात व ते विकत घेतात. मुळात ट्राॅलीत पाण्याची टँक ठेवून त्यात पाणी भरून वाहतूक करणे धाेकादायक आहे. कारण टँकमधील पाणी धक्क्यांमुळे हेलकावे घेते व अपघात हाेतात. पाण्याची टँक ट्राॅलीत न ठेवता ट्रॅक्टरला वेगळा टँकर जाेडून पाण्याची वाहतूक केली असता तर हा अपघात झाला नसता. त्यामुळे याेग्य उपाययाेजनांच्या अभावामुळे हा अपघात झाल्याची माहिती काही जाणकार व्यक्तींनी दिली.