नरेश डोंगरे नागपूर - ट्रेन नंबर १२६२१ तामिळनाडू एक्स्प्रेस रेल्वेस्थानकावरून सुटली. अल्पावधीतच ट्रेनने वेग पकडला अन् धावत्या गाडीत चढण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका महिलेचा गाडीच्या दाराच्या हॅण्डलमधून हात सुटला. काय होईल, याची कल्पना आल्याने अनेकांच्या काळजाचे पाणी झाले अन् दुसऱ्याच क्षणी देवदूत बनून आलेल्या एका तरुणाने रेल्वेगाडीच्या दारातून मृत्यूच्या जबड्यात जाऊ पाहणाऱ्या महिलेला अलगद फलाटावर ओढले.
नागपूरच्या मध्यवर्ती स्थानकावर रविवारी दुपारी २.७ वाजता काळजाचा ठोका चुकविणारी ही घटना घडली. ट्रेन नंबर १२६२१ तामिळनाडू एक्स्प्रेस नागपूरच्या रेल्वेस्थानकावरून सुटली. नेहमीप्रमाणे ट्रेन सुटण्याची वाट बघत फलाटावर घुटमळणारे प्रवासी धावत्या ट्रेनकडे धावले. त्यात दोन महिलाही होत्या. ट्रेनने वेग पकडला अन् धावत्या ट्रेनमध्ये चढण्याचा प्रयत्न करणाऱ्या केरळमधील इब्राहिमकुट्टी कन्नूर येथील रहिवासी सी. पी. सरेना (वय ४३) नामक महिलेचा गाडीच्या दाराच्या हॅण्डलमधून हात सुटला. प्रसंग भयंकर होता. काय होईल, याची कल्पना आल्याने अनेकांच्या काळजाचे पाणी झाले अन् दुसऱ्याच क्षणी त्यांच्या काळजाचा ठोकाही चुकला. देवदूत बनून धावत आलेले आरपीएफचे जवान जवाहर सिंह यांनी कमालीची तत्परता दाखवत या महिलेला अलगद मृत्यूच्या जबड्यातून फलाटावर ओढले. हा प्रसंग साऱ्यांनाच स्तंभित करणारा होता. सेरेनासोबत असलेली महिला नातेवाईक तर छातीच बडवू लागली. तिच्या एका नातेवाईकानेही धावत्या रेल्वेतून फलाटावर उतरून महिलेची वास्तपूस्त केली. बऱ्याच वेळेनंतर ती महिला अन् तिचे नातेवाईक सामान्य झाले अन् नंतर त्यांनी जवाहर सिंह यांचे भरल्या डोळ्यांनी आभार मानले.
अभिनंदन अन् रिवॉर्डजवाहर सिंह यांनी प्रसंगावधान राखत तत्परता दाखविल्यामुळेच सेरेनाचा जीव वाचला. त्यामुळे आरपीएफचे कमांडंट आशुतोष पांडे यांच्यासह रेल्वे सुरक्षा विभागातील अनेकांनी जवाहर सिंह यांचे अभिनंदन केले. त्यांच्या या कार्याबद्दल जवाहर यांना रिवॉर्ड देण्यात येईल, अशी माहितीही पांडे यांनी लोकमतशी बोलताना दिली.