लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : बलात्काराच्या गुन्ह्याशी संबंधित प्रकरणामध्ये येत्या १० मार्चपर्यंत उत्तर सादर करण्यात अपयश आल्यास औरंगाबाद पोलीस आयुक्तांनी या तारखेला स्वत: न्यायालयात उपस्थित राहून स्पष्टीकरण द्यावे, अशी तंबी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिली आहे.
या प्रकरणात औरंगाबाद पोलीस आयुक्त आणि सातारा पोलीस निरीक्षक यांना स्वतंत्र उत्तर सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. याशिवाय सातारा पोलीस निरीक्षकांना पुढील तारखेला केस डायरीसह न्यायालयात बोलावण्यात आले आहे. संबंधित मुलीच्या तक्रारीवरून नागपुरातील जरीपटका पोलिसांनी २३ ऑक्टोबर २०१९ रोजी आरोपी सौरभ संतोष तिवारी याच्याविरुद्ध बलात्काराचा गुन्हा नोंदवला होता. त्यानंतर जरीपटका पोलिसांनी क्षेत्राधिकाराच्या कारणावरून १२ नोव्हेंबर २०२० रोजी या गुन्ह्याचा तपास सातारा पोलिसांना हस्तांतरित केला. त्याविरुद्ध तक्रारकर्त्या मुलीने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. आरोपीने नागपूरसह विविध ठिकाणी बलात्कार केला होता. त्यामुळे गुन्ह्याचा तपास जरीपटका पोलिसांनी करावा असे तिचे म्हणणे आहे. तपास हस्तांतरित झाल्यानंतर सातारा पोलिसांनी वेगात तपास पूर्ण करून २४ डिसेंबर २०२० रोजी सक्षम न्यायालयात आरोपपत्रही दाखल केले. न्यायालयाने यातील काही संशयास्पद मुद्दे लक्षात घेता औरंगाबाद पोलीस आयुक्त आणि सातारा पोलीस निरीक्षक यांना स्वतंत्र उत्तर मागितले. प्रकरणावर न्यायमूर्तीद्वय सुनील शुक्रे व अविनाश घरोटे यांच्यासमक्ष सुनावणी झाली. याचिकाकर्तीतर्फे ॲड. ए. एस. बंड व ॲड. अमित बालपांडे यांनी कामकाज पाहिले.