लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : थकबाकीमुळे वीज कापली गेली तर पुन्हा कनेक्शन जोडून घेण्यासाठी आता दुप्पट पैसे मोजावे लागतील. राज्य वीज नियामक आयोगाने महावितरणच्या दर वृद्धी याचिकेवर दिलेल्या निर्णयात रिकनेक्शन शुल्क वाढवण्याची घोषणा केली आहे. महावितरणने वीज ग्राहकांना यापासून वाचण्यासाठी नियमितपणे वीज बिल भरण्याचे आवाहन केले आहे.जे वीज ग्राहक बिल भरत नाहीत, त्यांचे वीज कनेक्शन महावितरणतर्फे कापले जाते. थकीत रक्कम, दंड आणि रिकनेक्शन शुल्क भरल्यानंतर कापलेला वीजपुरवठा पुन्हा जोडला जातो. हे रिकनेक्शन शुल्क अनेक वर्षांपासून स्थिर होते. महावितरणने हे शुल्क वाढवण्याची मागणी केली होती, ती मंजूर करण्यात आली आहे. आता सिंगल फेज घरगुती ग्राहकांसाठी १०० रुपयांऐवजी २०० रुपये द्यावे लागतील. तर थ्री फेज कनेक्शन पुन्हा जोडण्यासाठी २०० रुपयांऐवजी ४०० रुपये मोजावे लागतील. हे शुल्क तेव्हाचे आहेत, जेव्हा वीज मीटरवरून कापण्यात येईल. जर थेट खांबावरून वीज कापली गेली तर सिंगल फेजसाठी १०० रुपयांच्या मोबदल्यात ३०० रुपये आणि थ्री फेजसाठी २०० नव्हे तर थेट ५०० रुपये भरावे लागतील. भूमिगत कनेक्शनसाठी आता हेच शुल्क द्यावे लागेल. एच.टी. कनेक्शन (औद्योगिक ग्राहक) यांच्यासाठी हे दर ८०० रुपयांवरून ३ हजार रुपये करण्यात आले आहे.मीटरची जागा बदलण्यासाठी लागणार हजार रुपयांपर्यंतचे शुल्कमीटरची जागा बदलण्यासाठी लागणाऱ्या शुल्कातही वाढ करण्यात आली आहे. सध्या हे शुल्क ३५० रुपये होते. परंतु आयोगाने आता सिंगल फेज मीटरसाठी ३८५ रुपये शुल्क केले आहे. थ्री फेजसाठी हेच शुल्क १००० रुपये करण्यात आले आहे.
-तर 'रिकनेक्शन'साठी दुप्पट पैसे! वीज नियामक आयोगाचा निर्णय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 03, 2020 11:12 PM