नागपूर : हमरीतुमरीच्या प्रसंगी नागपूरकर भोसल्यांनी समंजसपणा दाखवत पेशव्यांसमोर माघार घेतली आणि वाद टळला. असा इतिहासाचा दाखला देत, तसाच समंजसपणा पुढे दाखविला गेला असता, तर भारत कधीच पारतंत्र्यात गेला नसता, अशी भावना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी व्यक्त केली.
मंगळवारी महाल येथील सीनिअर भोंसला पॅलेसमध्ये श्रीमंत राजे रघुजी महाराज भोंसले (प्रथम) बहुद्देशीय स्मृती प्रतिष्ठान व महाराजा ऑफ नागपूर ट्रस्टच्या वतीने पार पडलेल्या राजरत्न पुरस्कार २०२३ वितरण सोहळ्यात अध्यक्षस्थानाहून भागवत बोलत होते. व्यासपीठावर श्रीमंत राजे रघुजी महाराज भोसले (पंचम) व श्रीमंत डॉ.राजे मुधोजी भोसले उपस्थित होते.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या हयात दक्षिण भारत मुक्त झाला, तर नागपूकर भोसल्यांच्या काळात पूर्व भारत परकीय मुक्त झाला. अशाच भारतमुक्तीच्या प्रसंगात नागपूरकर भोसले आणि पेशवे आपापल्या मार्गाने बिहारकडे निघाले. दरम्यान, दोघेही समोरासमोर आले आणि पुढे कोण जाणार, बिहार कोण काबीज करणार, अशी वादाची स्थिती निर्माण झाली. दोन्हीही पक्ष शूर होते, परंतु नागपूरकर भोसल्यांनी वादाला वाव न देता स्वत: पुढाकार घेत पेशव्यांना बिहारवर स्वारी करण्यास मार्ग दिल्याने आपसी वादाला तेथेच शमविल्याचे भागवत यावेळी म्हणाले. संचालन सारंग ढोक यांनी केले, तर आभार किशन शर्मा यांनी मानले.
मुकेश कुकडे, वि.स. जोग यांना राजरत्न पुरस्कार प्रदान
- यावेळी ‘लोकमत’चे ज्येष्ठ छायाचित्रकार मुकेश कुकडे यांना पत्रकारिता क्षेत्रातील छायाचित्रणाकरिता श्रीमंत राजे अजितसिंह महाराज भोसले स्मृती पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यासोबतच ज्येष्ठ साहित्यिक डॉ.वि.स. जोग, ज्येष्ठ पत्रकार महेश उपदेव, वर्धा येथील ज्येष्ठ खेळाडू गिरीश उपाध्याय, मुंबई येथील शास्त्रीय संगीत साधक नरेंद्रनाथ मेनन, ज्येष्ठ रंगकर्मी अनिल पालकर आणि १८ वर्षांखालील वयोगटात मृदुल घनोटे व हितवी शाह यांना राजरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यावेळी नागपूरकर भोसल्यांच्या इतिहासावर प्रकाश टाकणारे प्रा.डॉ.भालचंद्र हरदास व निकिता रमानी यांना विशेष सन्मान प्रदान करण्यात आला.
माझ्यावर कुणाचाच विश्वास नाही!
- तुम्ही माझी कितीही अतिशयोक्तीपूर्ण स्तुती केली, तरी त्यावर कुणाचाच विश्वास बसणार नाही, कारण मी गेली १४ वर्षे नागपुरात आहे. इथला स्वभाव मला माहीत असल्याचा अप्रत्यक्ष टोला निवेदकाने केलेल्या स्तुतीवर कटाक्ष टाकताना डॉ.मोहन भागवत यांनी यावेळी लगावला.