-तर नागपुरात लागल्या असत्या तीन ईव्हीएम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2019 11:53 PM2019-03-28T23:53:51+5:302019-03-28T23:54:38+5:30
नागपूर लोकसभा मतदार संघातून शेवटच्या दिवशी दोघांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला, अन्यथा एकाच वेळी तीन ईव्हीएम मशीन वापरण्याची वेळ नागपूर लोकसभा मतदार संघात आली असती.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नागपूर लोकसभा मतदार संघातून शेवटच्या दिवशी दोघांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला, अन्यथा एकाच वेळी तीन ईव्हीएम मशीन वापरण्याची वेळ नागपूर लोकसभा मतदार संघात आली असती.
मतदानासाठी बॅलेट पेपर जाऊन आता ईव्हीएम मशीन आल्या आहेत. एका ईव्हीएम मशीनवर केवळ १५ उमेदवार आणि नोटा असे एकूण १६ उमेदवारांचीच नावे अंकित राहू शकतात. त्यामुळे एका मतदार संघात १६ पेक्षा जास्त उमेदवार रिंगणात असल्यास दोन ईव्हीएम मशीन वापरावी लागेल. नागपूर लोकसभा मतदार संघासाठी तब्बल ३९ जणांनी अर्ज सादर केले होते. छाननीमध्ये ६ उमेदवारांचे अर्ज रद्द झाले. त्यामुळे ही संख्या ३३ वर आली; नंतर एका उमेदवाराने अर्ज मागे घेतल्याने ही संख्या ३२ झाली. गुरुवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस होता. आज कुणीही अर्ज मागे घेतला नसता तर तीन ईव्हीएम मशीन वापरण्याची वेळ आली असती. परंतु तसे झाले नाही. शेवटच्या दिवशी दोन उमेदवारांनी नावे मागे घेतली आणि निवडणुकीच्या रिंगणात एकूण ३० उमेदावर शिल्लक राहिले. त्यामुळे आता दोन ईव्हीएम मशीन वापरावी लागणार आहे.
रामटेकमध्ये ‘नोटा’साठी लागणार स्वतंत्र ईव्हीएम
रामटेक लोकसभा मतदार संघातून एकूण २४ जणांनी अर्ज सादर केले. छाननीमध्ये ३ अर्ज रद्द झाले, नंतर एकाने अर्ज मागे घेतला तर शेवटच्या दिवशी पाच उमेदवारांनी अर्ज मागे घेतले. त्यामुळे आता केवळ १६ उमेदवार रिंगणात आहेत. एका ईव्हीएमवर १६ उमेदवारांची नावे येऊ शकतात. यात १५ उमेदवार आणि १ नोटा आहे. तेव्हा एका ईव्हीएमवर सर्व १६ उमेदवारांची नावे घेण्यात येतील. तसेच नोटासाठी स्वतंत्र ईव्हीएम मशीन वापरली जाईल, असे जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी स्पष्ट केले.