लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कोहचाडे कांडामुळे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या अब्रूचे देशभरात धिंडवडे निघाले. शिक्षण क्षेत्रातील गैरव्यवहाराच्या या काळ्या रूपाने त्यावेळी सर्वांना हादरवून सोडले होते. त्या घटनेमुळे झालेले नागपूर विद्यापीठाच्या प्रतिष्ठेचे नुकसान अद्याप भरून निघाले नाही. असे असले तरी, गैरप्रकार पूर्णपणे बंद झालेला नाही. अलीकडच्या एका अवैध गुणवाढ प्रकरणामुळे नागपूर विद्यापीठात दुसरा कोहचाडे असण्याचा संशय मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाला आला आहे. परिणामी, न्यायालयाने प्रकरणाची व्यापक दखल घेतली आहे. अवैध गुणवाढ प्रकरणांवरील निर्णयांची माहिती नागपूर विद्यापीठाला मागण्यात आली आहे. सदर माहिती मिळाल्यानंतर हे प्रकरण जनहित याचिका म्हणून चालवायचे की नाही याचा विचार उच्च न्यायालय करणार आहे.अवैध गुणवाढीचे अलीकडचे प्रकरण करण हांडा या विद्यार्थ्याशी संबंधित आहे. याप्रकरणात बडतर्फ झालेल्या सहायक कुलसचिव (पुनर्मूल्यांकन) संध्या चुनोडकर-हांडा यांचा करण हा चिरंजिव होय. सेंट विन्सेन्ट पलोटी अभियांत्रिकी महाविद्यालयातील अभियांत्रिकी (मेकॅनिकल) अभ्यासक्रमाचा विद्यार्थी असलेल्या करणने २०११ मधील हिवाळ्यात तृतीय सेमिस्टरची परीक्षा दिली होती. त्यात तो अनुत्तीर्ण झाला होता. त्यामुळे त्याने पुनर्मूल्यांकनासाठी अर्ज दाखल केला होता. पुनर्मूल्यांकनात गुण वाढल्यामुळे तो उत्तीर्ण झाला. दरम्यान, मुन्ना पटेल यांनी ही गुणवाढ बेकायदेशीरपणे झाल्याची तक्रार तत्कालीन कुलगुरूंकडे केली. कुलगुरूंनी त्याची दखल घेऊन शिस्तपालन समितीला चौकशी करण्याचा आदेश दिला. समितीने चौकशी करून २७ सप्टेंबर २०१३ रोजी अहवाल सादर केला. त्यात संध्या चुनोडकर यांनी करणचे गुण बेकायदेशीरपणे वाढविल्याचा ठपका ठेवण्यात आला. तसेच, चुनोडकर यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई व करणचा तृतीय सेमिस्टरचा निकाल रद्द करण्याची शिफारस करण्यात आली होती.२ नोव्हेंबर २०१३ रोजी विद्यापीठाने करणचा तृतीय सेमिस्टरचा निकाल रद्द करण्याचा निर्णय दिला होता. त्याविरुद्ध करणने उच्च न्यायालयात धाव घेतली होती. न्यायालयाने त्याची याचिका अंशत: मंजूर केली. त्यानंतर विद्यापीठाने ३ नोव्हेंबर २०१७ रोजी सुधारित निर्णय घेऊन करणला नव्याने तृतीय सेमिस्टरची परीक्षा देण्यास सांगितले आहे. त्या निर्णयालाही करणने उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. परिणामी, न्यायालयाने याप्रकरणाची व्यापक दखल घेतली आहे. तसेच, करणच्या तक्रारीवर विद्यापीठाला १४ फेब्रुवारीपर्यंत उत्तर मागितले आहे. करणतर्फे अॅड. भानुदास कुलकर्णी यांनी बाजू मांडली.