लाचखोर गुप्तांच्या ‘कक्ष वापसी’ची जोरदार चर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2021 04:13 AM2021-08-17T04:13:31+5:302021-08-17T04:13:31+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : लाच स्वीकारताना रंगेहात पकडल्यामुळे एसीबीची कोठडी अनुभवणारे जिल्हा जलसंधारण अधिकारी रमेशकुमार हिरालाल गुप्ता ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : लाच स्वीकारताना रंगेहात पकडल्यामुळे एसीबीची कोठडी अनुभवणारे जिल्हा जलसंधारण अधिकारी रमेशकुमार हिरालाल गुप्ता हे कोठडी आटोपून दुसऱ्याच दिवशी त्यांच्या कक्षात पोहोचल्याचे वृत्त लोकमतने प्रकाशित केल्याने प्रशासकीय यंत्रणेत प्रचंड खळबळ उडाली. या वृत्ताने एकीकडे संबंधित वर्तुळात धावपळ निर्माण केली असतानाच दुसरीकडे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने तडकाफडकी कारवाईचा अहवाल तयार करून तो राज्य सरकारसह जिल्हा परिषद प्रशासनाला पाठवला.
रामटेक तालुक्यातील सालई पथराई येथे केलेल्या बांधकामाचे बिल काढण्यासाठी गुप्ता यांनी संबंधित कंत्राटदाराला ७५ हजार रुपयाची लाच मागितली होती. कंत्राटदाराने एसीबीच्या शीर्षस्थांकडे त्याची तक्रार नोंदवली. या पार्श्वभूमीवर, मंगळवारी रात्री संबंधित कंत्राटदाराकडून लाचेची रक्कम स्वीकारताच एसीबीच्या पथकाने गुप्तांच्या मुसक्या बांधल्या. बुधवारी गुप्तांना न्यायालयात हजर करून त्याची पोलीस कोठडी मिळवण्यात आली. गुरुवारी त्यांना जामीन मंजूर झाला. सरकारी सेवेतील अधिकारी अथवा कर्मचाऱ्याला लाच घेताना रंगेहात पकडल्यास नंतर संबंधित व्यक्ती रीतसर आदेश मिळाल्याशिवाय त्याच्या कार्यालयात येणार नाही, असे गृहित धरले जाते. मात्र, वादग्रस्त पार्श्वभूमी असलेले गुप्ता शुक्रवारी काहीच न झाल्याच्या आविर्भावात त्यांच्या कार्यालयात पोहोचले आणि त्यांनी नेहमीप्रमाणे आपल्या कक्षात बसून कामकाजही केले. त्यामुळे जिल्हा परिषदच नव्हे तर संपूर्ण प्रशासकीय यंत्रणेत उलटसुलट चर्चेला उधाण आले. लोकमतने यासंबंधाने जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यपालन अधिकारी योगेश कुंभेजकर यांच्याकडे विचारणा केली असता, त्यांनी ‘एसीबीकडून आमच्याकडे कारवाईचा अहवालच आलेला नाही. त्यामुळे यासंबंधाने प्रशासकीय कारवाईबाबत काहीच बोलता येणार नाही, असे म्हटले होते. मात्र, लोकमतने वृत्त प्रकाशित करताच अवघी प्रशासकीय यंत्रणाच दणाणली. लाचखोर अधिकारी एसीबीच्या कोठडीतून दुसऱ्याच दिवशी कार्यालयात बसून काम कसा करू शकतो, त्यांची घरवापसी झाली का,
अशी संतप्त विचारणा होऊ लागली. यामागचे गणित काय आहे, असा प्रश्नही उपस्थित करण्यात आला. त्यामुळे संबंधित वर्तुळात चांगलीच धावपळ वाढली. दरम्यान, लोकमतच्या वृत्ताची दखल घेत एसीबीच्या वरिष्ठांनीही ‘अहवाल का रेंगाळला’, अशी संबंधितांना विचारणा केली. त्यामुळे गुप्तांच्या कारवाईचा अहवाल तडकाफडकी (रविवारी) संबंधित अधिकाऱ्यांना पाठविण्यात आला.
----
घरझडतीत सापडली ४.२० लाखाची रोकड
गुप्ता यांच्या घरझडतीत एसीबीला ४,१९,८०२ रुपयांची रोकड तसेच ११ तोळे सोने सापडले होते. इतर साहित्यासह एसीबीने घरझडतीतील एकूण चीजवस्तूंचे मूल्यांकन ४४ लाख रुपये नोंदविले आहे.
----