विशेष समितीच्या मंजुरीशिवाय नागपूरच्या सीताबर्डीत नो पार्किंग नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 6, 2018 10:22 PM2018-04-06T22:22:51+5:302018-04-06T22:23:04+5:30
शहरातील विविध समस्या सोडविण्यासाठी कार्यरत असलेल्या विशेष समितीच्या मंजुरीशिवाय सीताबर्डीतील व्हेरायटी चौक ते लोहापुल रोडला नो पार्किंग झोन घोषित करणार नाही अशी ग्वाही वाहतूक विभागाने शुक्रवारी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाला दिली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : शहरातील विविध समस्या सोडविण्यासाठी कार्यरत असलेल्या विशेष समितीच्या मंजुरीशिवाय सीताबर्डीतील व्हेरायटी चौक ते लोहापुल रोडला नो पार्किंग झोन घोषित करणार नाही अशी ग्वाही वाहतूक विभागाने शुक्रवारी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाला दिली.
वाहतूक विभागाने गेल्या ३ मार्च रोजी अधिसूचना जारी करून सीताबर्डीतील व्हेरायटी चौक ते लोहापुल रोडला प्रायोगिकतत्त्वावर एक महिन्यासाठी नो पार्किंग झोन घोषित केले होते. २ एप्रिल रोजी त्या अधिसूचनेची मुदत संपली. परंतु, ती अधिसूचना वादग्रस्त ठरल्यामुळे वाहतूक विभागाने न्यायालयाला वरीलप्रमाणे ग्वाही दिली. त्यामुळे न्यायालयाने व्हेरायटी चौक ते लोहापुल रोडवरील नो पार्किंग झोनचे फलक ताबडतोब हटविण्याचा आदेश देऊन यासंदर्भातील याचिका निकाली काढली. सीताबर्डी मर्चंटस् असोसिएशनने अधिसूचनेला आव्हान दिले होते. संबंधित रोड ६० फुटाचा व वन वे असल्यामुळे वाहतूक कोंडी होत नाही. अधिसूचनेमुळे व्यवसाय बुडत आहे असे याचिकाकर्त्यांचे म्हणणे होते. याचिकाकर्त्यांतर्फे अॅड. फिरदोस मिर्झा तर, मनपातर्फे अॅड. जेमिनी कासट यांनी बाजू मांडली.