जगात अद्यापही आर्थिक स्वातंत्र्य नाही : मोहन भागवत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 16, 2019 10:33 PM2019-08-16T22:33:32+5:302019-08-16T22:37:33+5:30
१९२० साली नागपुरात पार पडलेल्या काँग्रेसच्या अधिवेशनात डॉ. हेडगेवार आणि अधिवेशन नियामक मंडळाने ‘पुंजीमुक्त विश्व’ अशी संकल्पना मांडली होती तर, डॉ. आंबेडकरांनी संविधानात आर्थिक स्वातंत्र्याचा सिद्धांत मांडला . दोन्ही संकल्पना एकच असून, तो विचार लघु उद्यमातून अखेरच्या घटकापर्यंत पोहोचला पाहिजे, असे कार्य लघु उद्योग भारतीने करावे, असे आवाहन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी आज येथे केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : १९२० साली नागपुरात पार पडलेल्या काँग्रेसच्या अधिवेशनात डॉ. हेडगेवार आणि अधिवेशन नियामक मंडळाने ‘पुंजीमुक्त विश्व’ अशी संकल्पना मांडली होती तर, डॉ. आंबेडकरांनी संविधानात आर्थिक स्वातंत्र्याचा सिद्धांत मांडला . दोन्ही संकल्पना एकच असून, तो विचार लघु उद्यमातून अखेरच्या घटकापर्यंत पोहोचला पाहिजे, असे कार्य लघु उद्योग भारतीने करावे, असे आवाहन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी आज येथे केले.
लघु उद्योग भारतीच्या रौप्य महोत्सवी वर्षाच्या पर्वाववर नागपुरात रेशीमबाग येथील कविवर्य सुरेश भट सभागृहात राष्ट्रीय अधिवेशनाचे आयोजन करण्यात आले आहे. शुक्रवारी अधिवेशनाच्या उद्घाटनप्रसंगी डॉ. मोहन भागवत आपले विचार व्यक्त करत होते. व्यासपीठावर लघु उद्योग भारतीचे राष्ट्रीय अध्यक्ष जितेंद्र गुप्त, विदर्भ प्रदेश अध्यक्ष रवी वैद्य उपस्थित होते.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्थापनेच्या पाच वर्षे आधी नागपुरात पार पडलेल्या काँग्रेसच्या राष्ट्रीय अधिवेशनाची संपूर्ण जबाबदारी डॉ. हेडगेवार यांनी पार पाडली होती. त्या अधिवेशनात हेडगेवार आणि अधिवेशन नियामक मंडळाने, भारताला संपूर्ण स्वातंत्र्य घोषित करा, अशी गर्जना केली होती. संपूर्ण स्वातंत्र्यानंतर भारतच जगाला ‘पुंजी चंगुल से मुक्ती’ अर्थात भांडवलमुक्त अर्थव्यवस्था देऊ शकतो, असा विश्वास दिला होता. त्यानंतर, संविधानाच्या रूपाने डॉ. आंबेडकरांनी आर्थिक स्वातंत्र्याचा विचार दिला. लघु-सूक्ष्म-मध्यम उद्योगातून हा आर्थिक स्वातंत्र्याचा किंवा भांडवलमुक्त अर्थव्यवस्थेचा मार्ग प्रशस्त होतो, असे भागवत यांनी यावेळी स्पष्ट केले. लघु उद्योग जेवढे वाढतील, तेवढ्याच प्रमाणात आर्थिक स्वातंत्र्यात वाढ होईल. त्यासाठी समग्र आणि लघुउद्योग केंद्रित विचार करावा लागेल. त्याकरिता लघु-सुक्ष्म-मध्यम उद्योगाच्या कारागिरीवर भर देणे अनिवार्य ठरेल आणि म्हणून कृषी, उद्योग व व्यापार यांचा समन्वय साधून एक योजना सादर करावी लागेल. या तिघांचा एकत्र विचार झाला तरच संपत्तीत वाढ होईल. याच विचारावर देशाला न्यावे लागेल. याच दृष्टिकोनातून लघुक्षेत्र संघटित होईल आणि तशा वातावरणाची निर्मिती होऊन उद्दिष्टपूर्ती साधली जाईल, असा विश्वास भागवत यांनी व्यक्त केला. हा विचार अखेरच्या घटकापर्यंत पोहोचवण्याचे कार्य कार्यकर्त्यांनी करावे, असे आवाहन भागवत यांनी केले. संचालन लघु उद्योग भारतीचे महासचिव गोविंद लेले यांनी केले. तर आभार रवी वैद्य यांनी मानले.
जेवढे विकेंद्रीकरण तेवढेच पर्यावरणाचे संवर्धन
उद्योग जेवढे विकेंद्रित असेल तेवढेच शोषण कमी असेल आणि त्याअनुषंगाने पर्यावरणाचा ऱ्हासही कमी होईल. एकंदर लघु-सुक्ष्म-मध्यम उद्योग पर्यावरणावर आधारित असल्याने, त्याचा विचार या उद्योगात केला जातो, असे डॉ. मोहन भागवत यावेळी म्हणाले. याप्रसंगी लघु उद्योग भारतीच्या लघुचित्रफितीचे विमोचन करण्यात आले.