एप्रिल महिन्यात ९० खाटांचे होणार ट्रॉमा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2018 12:10 AM2018-03-14T00:10:34+5:302018-03-14T00:10:47+5:30
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचा (मेडिकल) ‘ड्रीम प्रोजेक्ट’ ट्रॉमा केअर सेंटर एप्रिल महिन्यापासून पूर्ण क्षमतेने सुरू होण्याची शक्यता आहे. या सेंटरमध्ये आणखी ३० खाटांची भर पडून त्याची संख्या ९० होणार आहे. परिणामी, अपघातातील गंभीर रुग्णांना हे सेंटर वरदान ठरणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचा (मेडिकल) ‘ड्रीम प्रोजेक्ट’ ट्रॉमा केअर सेंटर एप्रिल महिन्यापासून पूर्ण क्षमतेने सुरू होण्याची शक्यता आहे. या सेंटरमध्ये आणखी ३० खाटांची भर पडून त्याची संख्या ९० होणार आहे. परिणामी, अपघातातील गंभीर रुग्णांना हे सेंटर वरदान ठरणार आहे.
रस्ता अपघाताच्या वाढत्या संख्येला लक्षात घेऊन प्रत्येक जिल्हाच्या ठिकाणी ट्रॉमा केअर सेंटरची घोषणा नुकतीच आरोग्य मंत्री डॉ. दीपक सावंत यांनी केली. यामुळे ‘ट्रॉमा’चे महत्त्व शासन दरबारी वाढले आहे. मात्र मेडिकलच्या ‘ट्रॉमा’ला अनेक अडचणीतून मार्ग काढावे लागले आहे. तब्बल चार वर्षानंतर बांधकामाला सुरूवात झाली. ३० खाटांपासून सुरू झालेले हे सेंटर आता दोन वर्षाचा कालावधी होत असताना अंतिम टप्प्यात पोहचले आहे. तूर्तास तरी ७० खाटा, एक शस्त्रक्रिया गृह, तीन अतिदक्षता विभाग व एका वॉर्डातून ‘ट्रॉमा’चा कारभार सुरू आहे. एप्रिल महिन्यात यात आणखी ३० खाटाने वाढ झाल्यास व २० व्हेंटीलेटरची भर पडल्यास हे सेंटर पूर्णत्वास येणार आहे. अधिष्ठाता डॉ. अभिमन्यू निसवाडे यांनी याला दुजोरा दिला आहे.
ट्रॉमा केअर सेंटरच्या एकाच छताखाली ‘इन्टरव्हेन्शनल रेडिओलॉजी’, सिटी स्कॅन, एक्स-रे, सोनोग्राफी उपकरण उपलब्ध करून देण्यात आल्याने अपघाताच्या रुग्णाला तातडीने उपचार मिळत आहे. तळमजल्यावर ‘कॅज्युल्टी’, रेडिओलॉजी व शस्त्रक्रिया गृह आहे. पहिल्या मजल्यावर दोन शस्त्रक्रिया गृह, एक सर्जिकल अतिदक्षता विभाग व ड्रग स्टोअर, तर दुसऱ्या मजल्यावर दोन अतिदक्षता विभाग व एक वॉर्ड आहे.
‘ट्रॉमा’त अद्ययावत वैद्यकीय सुविधा
मेडिकलच्या ट्रॉमा केअर सेंटरमध्ये रुग्णांसाठी अद्ययावत वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे, दोन शस्त्रक्रिया गृहाला ‘सेमी मॉड्यूलर’चे स्वरुप दिले जात आहे. हे काम पूर्णत्वास आल्यास व जिल्हा नियोजन समितीच्या निधीमधून २० व्हेंटिलेटर मिळाल्यास ९० खाटांमधून पूर्ण क्षमतेने ट्रॉमा केअर सेंटरला सुरूवात होईल.
डॉ. अभिमन्यू निसवाडे
अधिष्ठाता, मेडिकल