फाईल मंजूर करण्यासाठी होणार धावपळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 5, 2020 04:14 AM2020-12-05T04:14:12+5:302020-12-05T04:14:12+5:30
नागपूर : जवळपास नऊ ते दहा महिन्यापासून नागपूरमध्ये नव्या विकासकामांना ब्रेक लागला आहे. पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीची आचारसंहिता संपल्यानंतर ...
नागपूर : जवळपास नऊ ते दहा महिन्यापासून नागपूरमध्ये नव्या विकासकामांना ब्रेक लागला आहे. पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीची आचारसंहिता संपल्यानंतर फाईल मंजूर करण्यासाठी धावपळ सुरू होणार आहे. महापालिकेच्या निवडणुकीसाठी एक वर्षाचा कालावधी उरला आहे. सन २०२० मध्ये नगरसेवक आपल्या क्षेत्रात कोणतेच काम करू शकले नाही. त्यामुळे वर्ष संपण्यापूर्वी काही फाईल प्रक्रियेत आणण्यासाठी नगरसेवक जोर देणार आहेत.
कोरोनामुळे स्थायी समितीचे अध्यक्ष विजय झळके यांनी मे-जूनच्या ठिकाणी वर्ष २०२०-२१ चे प्रस्तावित बजेट ऑक्टोबरच्या दुसऱ्या पंधरवड्यात सादर केले. बजेट मंजूर झाल्यानंतर पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीची आचारसंहिता सुरु झाली. यामुळे नोव्हेंबर महिनाही वाया गेला. डिसेंबरचे शिल्लक राहिलेले दिवस आणि जानेवारी महिन्यातील अर्धा पंधरवडा स्थायी समितीकडे आहे. अशा स्थितीत एक ते दीड महिन्याच्या कालावधीत अधिकाधिक काम करण्याचा दबाव सत्तापक्षासमोर आहे. १५ जानेवारीनंतर आयुक्त आपले बजेट सादर करतात. त्यामुळे बजेटमध्ये मोठी कपात होण्याची भीती आहे. वर्ष २०२२ मध्ये होणाऱ्या महापालिकेच्या निवडणुकीकडे पाहता प्रत्येक पक्षाच्या नगरसेवकांसाठी वर्ष २०२१ खूप महत्त्वाचे आहे. या दरम्यान केलेली कामे घेऊन नगरसेवकांना वर्ष २०२२ मध्ये जनतेसमोर जावे लागणार आहे.
...........
शिल्लक बिलामुळे वाढला मनस्ताप
दिवाळीत महापालिका प्रशासनाच्यावतीने कंत्राटदारांना नाममात्र बिल अदा करण्यात आले. तर मागील डिसेंबर महिन्यापासून मार्च अखेरपर्यंत कंत्राटदारांचे १७० कोटी रुपये महापालिकेकडे शिल्लक आहेत. शिल्लक बिल न मिळाल्यामुळे कंत्राटदारांनी काम बंद केले आहे. कार्यादेश झालेली कामेही सुरू झालेली नाहीत. त्यामुळे नवी विकासकामे सुरु होऊ शकली नाहीत.
............