‘ते’ रोज विचारतात, काय झाले आमच्या रेल्वेचे?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2020 11:44 AM2020-05-29T11:44:10+5:302020-05-29T11:44:31+5:30
गेल्या शुक्रवारी (२२ मे) अजनी पोलीस स्टेशनमधून कॉल आला. उद्या निघायचेय. रेल्वे येणार, तयारीत राहा. वर्ष-दोन वर्षापासून गावाकडे न गेलेल्या या विद्यार्थ्यांना खूप आनंद झाला. हरखलेल्या सर्वांनी बॅगा भरल्या. ‘जिव्हाळा’ने निरोपही दिला. मात्र अद्यापही तो शनिवार मात्र उगवलेला नाही.
गोपालकृष्ण मांडवकर
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : गेल्या शुक्रवारी (२२ मे) अजनी पोलीस स्टेशनमधून कॉल आला. उद्या निघायचेय. रेल्वे येणार, तयारीत राहा. वर्ष-दोन वर्षापासून गावाकडे न गेलेल्या या विद्यार्थ्यांना खूप आनंद झाला. हरखलेल्या सर्वांनी बॅगा भरल्या. ‘जिव्हाळा’ने निरोपही दिला. मात्र अद्यापही तो शनिवार मात्र उगवलेला नाही. आता विद्यार्थी डोळ्यात पाणी आणून रोज विचारतात, झाली का आमच्या रेल्वेची व्यवस्था ?
ही व्यथा आहे नागपुरातील जिव्हाळा परिवारात शिक्षणासाठी राहणाऱ्या अरुणाचल प्रदेशातील विद्यार्थ्यांची. तीन हजारापेक्षा अधिक किलोमीटर अंतरावरील चांगलांग जिल्ह्यातील डायन सर्कलमध्ये राहणारे हे सर्व विद्यार्थी आहेत. पाचवी ते पदवीपर्यंतचे शिक्षण घेण्यासाठी आपला प्रदेश सोडून नागपुरात आलेल्या या मुलामुलींना जिव्हाळा परिवाराने मदतीचा हात दिला. परिस्थितीने अत्यंत गरीब असलेले, कुणाला पालक नसलेले तर कुणी एकल पालक असलेले हे विद्यार्थी नागेश पाटील यांच्या या परिवारात पाच वर्षापासून रमले आहेत. नागपुरातील दीनानाथ हायस्कूल, न्यू इंग्लिश हायस्कूल, हिस्लॉप कॉलेज, जेडी इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये ते शिकतात. जिव्हाळा परिवारात राहून अभ्यास करतात. वर्षातून एकदा आपल्या प्रांतात जातात. काही तर दोन-दोन वर्षे जात नाहीत.
देशात कोरोनाचा प्रकोप वाढल्याने या वर्षी सर्वांनी आपल्या गावाकडे जाण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे दहावीच्या वेळापत्रकानुसार अखेरचा पेपर होताच २५ मार्चला प्रवासाचे नियोजन झाले होते. रेल्वेचे आरक्षणही झाले होते. मात्र त्या आधीच २३ मार्चपासून लॉकडाऊन सुरू झाले. सर्वजण अडकले. रेल्वेने आरक्षण रद्द करून तिकिटाचे पैसेही परत केले. त्यामुळे लॉकडाऊन संपण्याची वाट पाहण्याशिवाय पर्याय नव्हता.
अशातच चौथ्या लॉकडाऊनमध्ये नियम शिथिल झाले. या विद्यार्थ्यांनीही प्रवासासाठी प्रशासनाकडे नावनोंदणी केली. परप्रातींय नागरिकांना पाठविण्यासाठी सरकारने नियोजन केले. काही रेल्वेही सोडल्या. दरम्यान, शुक्रवारी २२ मे रोजी त्यांना दुसऱ्या दिवशीच प्रवासाला निघण्यासाठी पोलीस स्टेशनमधून कॉल आला. मात्र तो शनिवार अद्यापही यायचाच आहे !
सुटायला लागला सर्वांचा धीर
विद्यार्थी रात्रभर जागून बॅगा भरत राहिले. गावाकडे जाण्याची आणि आप्तेष्टांना भेटण्याची स्वप्ने डोळ्यात घेऊन आनंदी झाले. नागेश पाटील, दीनबंधूचे नितीन सरदार, ज्ञानेश्वर रक्षक, मीनाताई या सर्वांनी निरोप दिला. मात्र आठवडा होऊनही ही रेल्वे अजूनही आलेलीच नाही. ती कधी येणार हे सांगायलाही प्रशासन तयार नाही. त्यामुळे या सर्वांच्या डोळ्यात पाणी दाटले आहे. मीडियातील बातम्या वाचून गावाकडूनही काळजीचे फोन येत असल्याने सर्वाच्या मनात अनामिक भीती दाटली आहे. या विद्यार्थ्यांचा धीर आता सुटायला लागला आहे.